12 December 2017

News Flash

प्रा. ए. व्ही. नरसिंह मूर्ती

तिरुपतीच्या मंदिरात ते लहानपणी आई-वडिलांबरोबर अनेकदा गेले.

लोकसत्ता टीम | Updated: April 21, 2017 3:52 AM

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपतीच्या मंदिरात ते लहानपणी आई-वडिलांबरोबर अनेकदा गेले. त्या भव्य मंदिरात दर्शनासाठी दहा ते बारा तास रांगेत उभे राहत. वेंकटेश्वराच्या दर्शनापेक्षा तेथील हुंडय़ांमध्ये भाविकांनी टाकलेली हजारो नाणी व नोटांची छाननी करण्याचे काम बघत राहणे, याचेच त्यांना आकर्षण होते. त्याच वेळी नाण्यांच्या दुनियेत काही तरी काम करायचे हे त्यांनी ठरवून टाकले.. ते होते प्रा. ए. व्ही. नरसिंह मूर्ती. आज नामवंत इतिहासकार, नाणीशास्त्रातील जाणकार आणि पुरातत्त्वशास्त्राचे गाढे अभ्यासक म्हणून देशभरात ते ओळखले जातात. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात मोलाची भर घातल्याबद्दल अलीकडेच त्यांना प्रतिष्ठेचा पुदुरू गुरुराज भट स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कर्नाटकाच्या म्हैसुरू जिल्ह्य़ातील एका छोटय़ाशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण गावी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते म्हैसुरू येथे आले. शालेय जीवनापासून मूर्ती यांना इतिहास या विषयाची आवड. पुढे त्यांनी याच विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पदव्युत्तर परीक्षेत सुवर्णपदक मिळाल्याने ७०च्या दशकात ते म्हैसुरू विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. पुढे १९७८ मध्ये प्राचीन इतिहासावरील पहिले पुस्तक लिहिताना डॉ. मूर्ती यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि वारसा यांच्याविषयी मूलगामी चिंतन त्यात केले.  याच काळात त्यांची भेट डॉ. पुदुरू गुरुराज भट यांच्याशी झाली. ते वयाने त्यांच्यापेक्षा मोठे होते. म्हैसुरूमधील एका महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. मूर्ती यांचे पीएचडी संशोधनातील गुरू डॉ. एम. शेषाद्री यांच्याकडेच त्यांनाही संशोधन करण्याची इच्छा होती. भट यांची तुलू नाडू भागाला सांस्कृतिक ओळख मिळावी अशी इच्छा होती. त्यावरच त्यांना संशोधन करावयाचे होते. मूर्ती त्यांना घेऊन डॉ. शेषाद्री यांच्याकडे गेले. त्यांनाही हा विषय आवडला. तेथून मग तब्बल दोन दशके भट यांनी उडुपी आणि दक्षिण कर्नाटकातील जिल्हे पालथे घातले. तेथील मंदिरांची माहिती जमवली. शेकडो प्राचीन हस्तलिखितांचा अन्वयार्थ लावून आपला प्रबंध सादर केला. कर्नाटकातील इतिहासाच्या क्षेत्रात हे संशोधन मैलाचा दगड मानले जाते. भट यांच्या संशोधनात मूर्ती यांचेही योगदान महत्त्वाचे होते.

सेवाज्येष्ठतेबरोबरच गुणवत्तेच्या जोरावर डॉ. मूर्ती विद्यापीठात इतिहास विभाग प्रमुख बनले. त्याआधी इतिहासाबरोबरच नाणीशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्राचाही त्यांनी अफाट व्यासंग केला. ‘द कॉइन्स ऑफ कर्नाटका’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या व्यासंगाची साक्ष देते. तिरुपतीच्या मंदिरात जमा होणाऱ्या प्राचीन नाण्यांचे वर्गीकरण करण्याचे महत्त्वाचे कामही मूर्ती यांनी केले आहे. ‘इण्डियन एपिग्राफी’, ‘हेमकुटा’, ‘द सेव्हरन्स ऑफ देवगिरी’ यांसारखी इतिहासावरील अनेक क्रमिक पुस्तके त्यांनी लिहिली, जी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना आजही मार्गदर्शक ठरत आहेत. विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर भारतीय विद्या भवनच्या म्हैसुरू शाखेने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांना बोलावले. आज ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. परवा, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते मूर्ती यांनी हा पुरस्कार स्वीकारला तेव्हाही ‘इतिहास असो वा विज्ञान, यातील संशोधनाला सरकारने जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले पाहिजे,’ अशीच अपेक्षा या इतिहासकाराने नम्रपणे व्यक्त केली..

 

First Published on April 21, 2017 3:52 am

Web Title: loksatta vyakti vedh av narasimha murthy