एमआयटीच्या प्राध्यापकाने एकदा वर्गातील विद्यार्थ्यांची कसोटी पाहणारा प्रश्न वर्गात विचारला होता. त्या वेळी एका मुलीने तो कूटप्रश्न अगदी अचूक सोडवला, पण प्राध्यापकाचा तिच्यावर विश्वास नव्हता. ते म्हणाले, तुझ्या बॉयफ्रेंडने तो सोडवला असेल. खोटे बोलू नकोस. सर, मला बॉयफ्रेंड नाही व दुसरे म्हणजे प्रश्न माझा मीच सोडवला आहे. त्यावर प्राध्यापक महाशय निरुत्तर झाले. या मुलीचे नाव होते बार्बरा. किन्नर असल्याने नंतर तीच बनली बेन बॅरेस. बॅरेस यांनी स्त्री व पुरुष दोन्हींना समाजात कशी वागणूक मिळते याचा अनुभव एकाच जन्मात घेतल्यासारखे होते. बेन हे नंतर प्रख्यात मेंदूजीवशास्त्रज्ञ म्हणून नावारूपास आले. मेंदूतील ज्या ग्लायल पेशी या किरकोळ समजल्या जात असत, त्यांचे महत्त्व त्यांनी मेंदूविज्ञानात अधोरेखित केले होते. बॅरेस यांचे नुकतेच निधन झाले.

ग्लायल पेशींचा संबंध हा कंपवात म्हणजे पार्किन्सनशीही असतो हे त्यांनी स्पष्ट केले. महिलांना विज्ञानात समान संधी मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी नेहमीच पाठपुरावा केला. १९९७ मध्ये बार्बराचा ‘बेन’ झाला त्या वेळी ते चाळिशीत होते. ‘डज जेंडर मॅटर’ नावाचा लेख त्यांनी नेचर नावाच्या नियतकालिकात लिहिला होता. तेव्हा अनेक बडय़ा विद्वानांनी महिलांची आकलन क्षमताच कमी असते, त्यामुळे त्या विज्ञानात पुढे जात नाहीत. त्यांच्यात अंतर्गतच काहीतरी फरक असतो असा वादग्रस्त युक्तिवाद त्या लेखावर केला होता. त्यावर अर्थातच आधी स्त्री राहिलेल्या बेन यांनी सडकून टीका केली. स्त्री असताना त्यांना कसे किरकोळ समजले जात होते व नंतर पुरुष म्हणून कशी वागणूक मिळाली याचे अनुभव त्यांनी सांगितले होते.कॉर्नेल विद्यापीठात आंतरवासीयता पूर्ण करताना त्यांना मेंदूचा ऱ्हास कसा होत जातो याचे कोडे पडले. नंतर हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये परतल्यानंतर त्यांनी त्याच विषयात पीएच.डी. केली.   मेंदूच्या महत्त्वाच्या कामात ग्लायल पेशींची फार महत्त्वाची भूमिका नसते हा आधीचा समज त्यांनी खोटा ठरवला. ग्लायल पेशींमध्ये आयन मार्गिका असतात हे तर त्यांनी सांगितलेच, शिवाय प्रतिपिंडांचा वापर करून या पेशी वेगळय़ा काढून दाखवल्या. स्टॅनफर्ड विद्यापीठात त्यांनी स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केली. त्यानंतर ग्लिआ पेशींचा मेंदूतील जोडण्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट केले. आपल्या जगण्याला मर्यादा आहेत हे त्यांना माहीत होते, त्यामुळे त्यांनी अनेक विद्यार्थी तयार केले. त्यातून आता त्यांचे संशोधन पुढे जाणार आहे.