18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

डॉ. भीमराव गस्ती

बेळगावनजीकचे यमनापूर हे गस्ती यांचे मूळ गाव.

लोकसत्ता टीम | Updated: August 11, 2017 2:49 AM

इलेक्ट्रॉनिक्ससारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि याच विषयातील रशियन विद्यापीठातील डॉक्टरेट मिळवलेल्या माणसाला चारचौघांसारखे सरळ आयुष्य जगणे मुळीच अवघड नव्हते. पण डॉ. भीमराव गस्ती नावाच्या माणसाचा पिंडच कार्यकर्त्यांचा होता. म्हणूनच देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि अंधश्रद्धा व रूढी-परंपरांनी जखडलेल्या बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य वाहून घेतले.

बेळगावनजीकचे यमनापूर हे गस्ती यांचे मूळ गाव. एकदा सुट्टीत ते गावी आले असता बेरड समाजातील २० तरुणांना दरोडय़ाच्या खोटय़ा गुन्ह्य़ात अडकवून त्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीविरुद्ध मग ते पेटून उठले. या निरपराध तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी गस्ती यांनी मोर्चे, निदर्शने व आंदोलन या सनदशीर मार्गाचा अवलंब केला. या घटनेने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. रामोशी  समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसू लागल्याने ते व्यथित झाले. मग बेरड समाजाची उन्नती हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास बनला. याबरोबरच देवदासी महिलांचा प्रश्नही त्यांनी हाती घेतला. यासाठी बेळगावात ‘उत्थान’ ही सामाजिक संस्था गस्ती यांनी सुरू केली. बघता बघता या संस्थेचे काम कर्नाटकाबरोबरच आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातही विस्तारले. निपाणी येथे त्यांनी मुलींसाठी वसतिगृह सुरू केले. देवदासी प्रथेचे निर्मूलन व्हावे यासाठी त्यांनी स्वखर्चाने अनेक देवदासींचे विवाह केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीमुळे अनेक देवदासींच्या मुली शिक्षण घेऊ शकल्या. त्यातील अनेक मुली आज ठिकठिकाणी उच्च पदांवर कार्यरत आहेत. बेरड व देवदासींच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी संघर्ष केला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापासून ते राष्ट्रपतींपर्यंत ते निवेदने घेऊन जात. बेळगावला येणारे केंद्रीय मंत्री तसेच राज्यातील मंत्र्यांना भेटूनही आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडत. निरलसपणे त्यांचे हे काम चालत असल्याने समाजाच्या विविध घटकांनी त्यांना नेहमी पाठिंबा दिला. सामाजिक कार्य करताना त्यांचे लिखाणही चालू होते. वृत्तपत्रांतून सामाजिक विषयांवर लिहितानाच ‘बेरड’ हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध झाले. दया पवार यांचे ‘बलुतं’ वा प्राचार्य प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणींचे पक्षी’ यांसारख्या प्रांजळ आत्मकथनांनी मराठी साहित्यविश्वात एक वेगळे दालन खुले केले. याच परंपरेतील भीमराव गस्ती यांचे हे आत्मकथनही खूप गाजले. या समाजातील रूढी, परंपरांसोबतच या समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे भेदक आणि वास्तव चित्रण यात असल्याने मराठी साहित्यात त्याने खळबळ उडवून दिली. मग राज्य सरकारसह विविध सात पुरस्कार या पुस्तकाला मिळणे ओघाने आलेच. त्याचे अनेक भाषांत मग अनुवादही झाले. सांजवारा, आक्रोश ही त्यांची पुस्तकेही वेगळ्या विषयांना हात घालणारी होती.

सामाजिक चळवळीत ४०-४५ वर्षे काम करताना त्यांना अनेकदा त्रासही झाला. अलीकडच्या काळात वाढलेला कामाचा पसारा व आजारपणामुळे होणारा खर्च आटोक्याबाहेर चालला होता. यामुळे आयुष्यात प्रथमच त्यांनी आपल्या अगदी निकटच्या मित्रांना आर्थिक मदतीचे आवाहनही अलीकडेच पत्र पाठवून केले होते. पण ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मंगळवारी, ७० व्या वर्षी भीमराव गस्ती यांची संघर्षयात्रा कायमची थांबली. त्यांच्या निधनाने वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी तळमळीने लढणारा सच्चा कार्यकर्ता व प्रतिभावंत साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

 

First Published on August 11, 2017 2:49 am

Web Title: loksatta vyakti vedh bhimrao gasti