News Flash

डॉ. संघमित्रा बंडोपाध्याय

संगणनात्मक जीवशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.

कोलकात्याच्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या त्या पहिल्या महिला संचालक आहेत, पण त्यांची ओळख केवळ सांख्यिकीतज्ज्ञ ही नाही तर संगणनात्मक जीवशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. संगणकशास्त्र, सांख्यिकी, वैद्यकशास्त्र या तिन्ही शाखांचा मिलाफ त्यांच्या आजवरच्या कामात आहे. त्यांचे नाव डॉ. संघमित्रा बंडोपाध्याय. संघमित्रा यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेत नुकताच इन्फोसिसचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

संघमित्रा यांचा जन्म १९६८ मधला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेतल्यानंतर संगणक अभियांत्रिकीत कोलकाता विद्यापीठातून मास्टर्स पदवी घेतली. नंतर खरगपूर आयआयटीमधून त्या एमटेक व नंतर सांख्यिकी संस्थेतून पीएचडी झाल्या. संगणक अभियांत्रिकीचा हा प्रवास त्यांना जीवशास्त्रीय संशोधनाकडे केव्हा घेऊन गेला हे त्यांनाही कळले नाही. संगणकातील प्रगत तंत्र, आरेखनावरून निष्कर्ष, यंत्र शिक्षण, जैवमाहितीशास्त्र या शाखेत त्यांना सारखीच गती आहे. त्यांना २०१० मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला. एकीकडे सांख्यिकी संस्थांच्या पाच शाखांचे काम सांभाळत असताना त्या कर्करोग, अल्झायमर, एचआयव्ही या रोगांच्या उत्पत्तीवर गेली दहा वर्षे संशोधन करीत आहेत. संगणकशास्त्राच्या मदतीने पेशींच्या वर्तनावर लक्ष ठेवता येते हे त्यांनी सांगितले. जैविक माहितीचे विश्लेषण करण्यासाठी संगणकाचा वापर केला. मानवी पेशीची गुपिते समजली तर कर्करोग व एड्सवर मात करणे शक्य आहे यात शंका नाही, ते आव्हान पेलणाऱ्या वैज्ञानिकांपैकी त्या एक आहेत. कर्करोगाच्या पेशींचे वर्तन संगणकीय नकाशाच्या माध्यमातून तपासण्याचे काम त्या करीत आहेत व त्याला जगात मान्यता मिळाली आहे. स्तनाचा व आतडय़ाचा कर्करोग कसा होतो व नेमकी सुरुवात कशी होते याचा शोध त्या घेत आहेत. सूक्ष्म आरएनए पातळीवर हे संशोधन आहे, रेणूंच्या एकमेकांशी ज्या आंतरक्रिया होतात त्यातून प्रथिनांच्या निर्मितीचे नियंत्रण केले जाते. पेशीत जेव्हा प्रथिननिर्मितीत असमतोल निर्माण होतो तेव्हा पेशींचे विभाजन व पेशींचा मृत्यू यातील समतोल बिघडतो तिथून कर्करोगाची खरी सुरुवात होते, असे त्यांचे म्हणणे आहे. आरएनए हे जनुकीय खुणेसारखे असतात. त्यातून कर्करोग आधीच समजू शकतो किंबहुना या खुणाच कर्करोगाचा सांगावा घेऊन येतात, पण तो आपल्याला एरवी समजत नाही. आरएनए रेणूंचे कर्करोग पेशीतील वर्तन व निरोगी पेशीतील वर्तन यांच्या माहितीच्या आधारे संघमित्रा यांनी काही जैवसंगणकीय नकाशे तयार केले आहेत. जनुकीय क्रमवारीने आता कर्करोगाचे निदान खूप आधीच करता येणे शक्य आहे. आणखी पन्नास वर्षांनी रक्ताच्या चाचणीसारखीच कर्करोगाची चाचणी अगदी सर्वपरिचित झालेली असेल, असे त्या सांगतात. त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे त्याचा वापर सांदिया नॅशनल लॅबोरेटरी येथे दूषित पाण्यातील घटक ओळखण्यासाठी केला जातो. त्यांनी स्तनाच्या कर्करोगाची जनुकीय खूण म्हणजे जेनेटिक मार्कर शोधला, तो  संशोधनात  खरा  असल्याचे सिद्ध  झाले. भारतीय विज्ञान अकादमीचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार, विज्ञान-तंत्रज्ञान विभागाची स्वर्णजयंती फेलोशिप, भारतीय अभियांत्रिकी अकादमीचा तरुण अभियंता पुरस्कार, हुम्बोल्ट फेलोशिप असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण संघमित्रा यांच्या पाठीमागे त्यांचे पती उज्ज्वल मौलिक भक्कमपणे उभे आहेत. त्यांना अनेक कंपन्यांचे देकार आले, पण त्यांनी सांख्यिकी, संगणकविज्ञान क्षेत्रातच काम करण्याचे निश्चित केले होते. त्यांच्या या संशोधनातून कर्करोग, अल्झायमर व एड्सचे कोडे उलगडण्यास मदत होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 2:42 am

Web Title: loksatta vyakti vedh dr sanghamitra bandyopadhyay
Next Stories
1 डॉ. श्रीनिवास वरखेडी
2 नीरज व्होरा
3 ममता कालिया
Just Now!
X