12 December 2017

News Flash

ईनम गंभीर

गेले दोन-तीन दिवस समाजमाध्यमांमध्ये ईनम गंभीर या नावाची चर्चा आहे.

लोकसत्ता टीम | Updated: September 25, 2017 3:11 AM

गेले दोन-तीन दिवस समाजमाध्यमांमध्ये ईनम गंभीर या नावाची चर्चा आहे. हॅशटॅग देऊन त्यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणाची चर्चा होते आहे. ईनम गंभीर तसे बघितले तर भारताच्या अमेरिकेतील एक युवा राजनैतिक अधिकारी, पण त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या  आमसभा अधिवेशनात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांना चपराक दिली अन् ती चपखल बसलीही. ईनम तेथील दूतावासातील अनुभवाने, वयाने कमी असूनही त्यांनी जगासमोर पाकिस्तानची जी धुलाई केली ती लाजवाबच होती.

पाकिस्तानने दर वेळीप्रमाणे यंदाही काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला. मानवी हक्कांच्या नावाने गळे काढले, त्यावर भारताला उत्तर देण्याचा अधिकार होता. त्या संधीचा पुरेपूर वापर ईनम यांनी अगदी कमी वेळेत मोजक्या शब्दांत पाकिस्तानला निष्प्रभ ठरवण्यासाठी केला. ओसामा बिन लादेनला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादाबाबत बोलण्याचा काही अधिकार नसून पाकिस्तान म्हणजे टेररिस्तान झाले आहे, असा वर्मी घाव लागणारा टोला ईनम यांनी लगावला. ईनम गंभीर या २००५च्या तुकडीतील परराष्ट्र सेवेतील अधिकारी. त्या सध्या न्यूयॉर्कमध्ये भारताच्या स्थायी दूतावासात काम करतात. त्यांनी भारतात असताना पाकिस्तानविषयक विभागात २०१५ पर्यंत काम केले, त्यामुळे पाकिस्तान हा त्यांचा आवडता विषय. पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील सगळे बारकावे त्यांना ठाऊक आहेत. यापूर्वी त्यांनी अर्जेटिनातील दूतावासातही काम केले आहे. गंभीर या दिल्लीकर आहेत. त्यांचे शिक्षण तेथील दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून झाले. नंतरचे शिक्षण जीनिव्हा विद्यापीठातून त्यांनी पूर्ण केले. स्पेनमध्ये त्यांना पहिली नेमणूक मिळाली तेव्हा त्यांनी स्पॅनिश भाषेवर प्रभुत्व मिळवले. परदेशी भाषांत तीच भाषा त्यांना जास्त आवडते. नंतर ब्राझीलमध्ये त्यांनी काम केले व काही काळ भारतात परराष्ट्र विभागातील पाकिस्तानविषयक बाबी त्या बघत असत. नंतर त्या संयुक्त राष्ट्रात गेल्या. तेथील भारतीय दूतावासात त्यांना सुरक्षा मंडळ सुधारणा, दहशतवादविरोधी उपाययोजना, सायबर सुरक्षा प्रश्न, ‘नाम’ समन्वय असे काही विषय दिलेले आहेत, त्यात पाकिस्तान हाही एक विषय आहेच. गेल्या वेळी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही भारतावर टीका केली होती. त्या वेळी अवघ्या ५३१ शब्दांच्या भाषणात ईनम यांनी त्यांना चितपट केले होते.  पाकिस्तानच्या वागण्या आणि बोलण्यात जो फरक आहे तो नेमका हेरून दोन्ही वेळा ईनम यांनी त्या देशाचा लबाडपणा जगापुढे उभा केला. पाकिस्तान म्हणजेच दहशतवाद हे समीकरण विविध देशांतील बडय़ा नेत्यांच्या मनावर ठसवण्यात त्या यशस्वी झाल्या. पाकिस्तानसारख्या देशाच्या पंतप्रधानाला उत्तर देण्यासाठी ईनम यांच्यासारख्या तरुण, तडफदार अधिकाऱ्याची निवड करणे यातही आपल्या राजनयाची एक वेगळी व्यूहरचना सहज दृष्टोत्पत्तीस येते. यात त्यांचे वक्तृत्व कौशल्य, बेधडकपणा यांचा चांगला उपयोग झालेला आहे यात शंका नाही. त्या राजनैतिक अधिकारी असल्या तरी मूळ गणिताच्या पदवीधर आहेत. पाकिस्तानसारख्या तुसडय़ा शेजारी देशाच्या युक्तिवादातील वैगुण्य पकडून त्यावर वज्राघात करण्यासाठी जी तर्कसुसंगतता लागते ती निश्चितच ईनम यांच्याकडे आहे. पूर्वी शरीफ व आता अब्बासी यांना त्यांनी दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे दोघांचीही बोलती बंद झाली हे वास्तव आहे. तुलनेने त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणता येतील अशा पाकिस्तानच्या मलिहा लोधी यांनी या सगळ्या प्रकारानंतर पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी केलेले वक्तव्य फारसे प्रभावी नव्हते. त्यातही लोधी या अनुभवाने ज्येष्ठ असल्या तरी त्यांनाही ईनम यांनी मागे टाकले आहे.

 

First Published on September 25, 2017 3:11 am

Web Title: loksatta vyakti vedh eenam gambhir