गुप्तचर अधिकारी म्हणून काम करणे हे तसे आव्हानात्मकच. इस्रायलच्या मोसादपासून सीआयएपर्यंत अनेक ठिकाणी महिला गुप्तहेर म्हणून किंवा अधिकारी पदावर काम करीत आहेत. अनेकदा ओळख लपवून करावे लागणारे काम, कठोर होऊ न घ्यावे लागणारे निर्णय व पाळावी लागणारी गुप्तता यामुळे त्यात मोठे कौशल्य लागते. अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे सीआयए या संस्थेच्या प्रमुखपदी गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात गिना हास्पेल यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती झाली आहे.

१९८५ मध्ये रोनाल्ड रेगन अध्यक्ष असताना गिना यांचा सीआयएमध्ये समावेश झाला तेव्हापासून ३३ वर्षे त्या गुप्तचर संस्थेत काम करीत आहेत. ११ सप्टेंबर २००१ मधील दहशतवादी हल्ल्यानंतर सीआयएने थायलंडमध्ये गुप्तपणे एक छळछावणी चालवली होती, ती जबाबदारी गिना यांनी पार पाडली. तेथे काही कैद्यांचा अमानुष छळ केल्याचा आरोप असूनही त्या या पदावर विराजमान झाल्या आहेत. एकीकडे आरोपींकडून कबुलीसाठी वेगवेगळ्या क्रूर तंत्राचा वापर तर दुसरीकडे मदर तेरेसा यांच्या मानवतावादी कार्यक्रमास मदत, असा मानवी स्वभावाचा मोठा पैस त्यांच्यात दिसतो. अर्थात यात कर्तव्य बजावणे व व्यक्तिगत जीवन यांची गल्लत करून अनेकांनी त्यांच्या निवडीवर टीका केली असली तरी आता मात्र त्यांनी अगदी ट्रम्प यांनी सांगितले तरी कैद्यांचा छळ करण्यास मान्यता देणार नाही, असा शब्द दिला आहे. गिना हास्पेल यांचे वडील हवाई दलात होते. त्यांचे शालेय शिक्षण ब्रिटनमध्ये तर पुढील शिक्षण केंटुकी विद्यापीठात झाले. लुईसव्हिले विद्यापीठातून बीए व पत्रकारितेत पदवी घेऊन त्या बाहेर पडल्या. काही काळ मॅसेच्युसेट्स येथे एका वाचनालयात त्यांनी काम केले. नंतर पॅरालीगलमधील पदवी घेऊन त्या वेगळ्या मार्गाने गेल्या, शीतयुद्ध संपलेले नसताना त्या रेगन यांच्या काळात सीआयएमध्ये आल्या तेव्हा त्यांनी लंडनमधील एका मोहिमेसह अनेक गुप्त कामगिऱ्यांत भाग घेतला. विशेष मोहिमा विभागाच्या त्या पहिल्या महिला उपसंचालक. राष्ट्रीय गुप्त सेवेतही त्यांनी उपसंचालक म्हणून काम केले. २००२ मध्ये थायलंडमध्ये छळछावणीत ‘कॅट्स आय’ नावाची मोहीम चालवण्यात आली होती. त्यात कैद्यांचे जाबजबाब घेताना पाण्यात बुडवणे, झोपेपासून वंचित ठेवणे असे छळाचे अनेक प्रकार राबवण्यात आले. त्या मोहिमेचे प्रमुखपद गिना यांच्याकडे होते. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्याशी असलेल्या दोस्तान्यातून त्या या पदावर पोहोचलेल्या नाहीत. अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. एका महिलेने जगातील नामांकित गुप्तचर संस्थेचे प्रमुखपद पटकावल्याने विश्वभरातील महिलांसाठी ही बाब भूषणावह आहे.