वैज्ञानिक, कुशल व्यवस्थापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक अशी एक ना अनेक विशेषणं प्रा. यशपाल यांच्या नावाच्या आधी लावता येतील. वैज्ञानिक म्हणून विज्ञान संशोधनाबरोबर समाजात विज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काय करावे याचा आदर्श प्रा. यशपाल यांनी त्यांच्या कामातून वैज्ञानिकांसमोर ठेवला. त्यांच्या निधनाने सच्चा विज्ञानसाधक हरपला आहे.

यशपाल सिंग यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६ मध्ये झांग (आत्ताचे पाकिस्तान) येथे झाला. बालपण बलुचिस्तानमधील क्वेटा भागात गेले. १९३५मध्ये या भागात आलेल्या भूकंपामध्ये त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. यानंतर त्यांनी त्यांच्या आजोळी आश्रय घेतला. काही दिवसांनी ते पुन्हा क्वेटामध्ये आले. तेथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनातील जिज्ञासा दिसत होती. शाळेत सर्व शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देत असल्यामुळे त्यांचे मित्र त्यांना ‘मोटा सीर’ (हुशार डोके) या नावाने हाक मारत. या भागात खेळत असताना त्यांना व त्यांच्या मित्रांना विमान उडताना दिसले. त्या भागात एक विमानतळ होते तेथे महिन्यातून एकदा कधी तरी विमान येत असे. हे विमान नक्की काय आहे याचा शोध घेण्यासाठी ते त्यांच्या मित्राला घेऊन सायकलवरून विमानतळावर पोहोचले आणि वैमानिकाशी संवाद साधला. अशाच प्रकारे आपल्या आसपास घडणाऱ्या घडमोडींबाबत जागरूक राहून त्याची माहिती करून घेण्याची त्यांची जिज्ञासा लहानपणापासूनच होती. याच कालावधीत त्यांच्या वडिलांची बलुचिस्तानातून मध्य प्रदेशात जबलपूर येथे बदली झाली. त्या वेळेस त्यांनी खऱ्या अर्थाने हिरवळ पाहिली आणि त्यांचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. येथे पुढचे शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी १९४९ मध्ये पंजाब विद्यापीठात भौतिकशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी टाटा मूलभूत विज्ञान शिक्षण संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. १९५८ मध्ये पीएच.डी. करण्यासाठी ते एमआयटीमध्ये गेले. पीएच.डी. मिळवल्यानंतर पुन्हा टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत रुजू झाले. वैश्विक किरणांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. यानंतर १९७२ मध्ये केंद्र सरकारने भारतीय अंतराळ संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या अंतर्गत १९७३ मध्ये अहमदाबाद येथे ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर’ सुरू झाले तेव्हा या केंद्राची धुरा यशपाल यांच्यावर सोपवण्यात आली. या केंद्रात त्यांनी १९७५-७६ या कालावधीत ‘उपग्रह अध्ययन दूरचित्रवाणी प्रयोग’ (एसआयटीई)वर काम करून शिक्षणाच्या माध्यमाला नवी दिशा दिली. मात्र हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी त्यांना देशातील लोकांची मानसिकता बदलण्यापासून अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते. त्यांच्या या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात  आली. यामुळे १९८१-८२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंतराळ क्षेत्राशी संबंधित परिषदेसाठी त्यांची महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आली. यानंतर १९८३-८४ मध्ये ते नियोजन आयोगाचे सल्लागार म्हणून काम करीत होते. विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, जेएनयूचे कुलगुरू अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. हे काम करीत असताना विज्ञान शिक्षणाला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. २००९ मध्ये केंद्र सरकारने नेमलेल्या उच्च शिक्षणासंदर्भातील त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आंतरविद्यापीठीय केंद्राच्या स्थापनेला महत्त्व देत उच्च शिक्षणालाही नवी दिशा दिली. सामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत विज्ञान पोहोचवण्यासाठी त्यांनी दूरदर्शनवर ‘टर्निग पॉइंट’ आणि ‘भारत की छाप’ या मालिकाही केल्या. त्यांच्या या कार्याबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषणने सन्मानितही केले. याचबरोबर अनेक मानाचे विज्ञान पुरस्कार त्यांनी मिळवले होते.

elon musk postpones trip to india
‘टेस्ला’चे मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर; वर्षअखेरीस भेटीचे सुतोवाच
PM Narendra Modi in Nagpur
पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू