25 April 2019

News Flash

डॉ. सौम्या स्वामिनाथन

वैद्यक क्षेत्रात डॉ. सौम्या स्वामिनाथन हे नाव तसे सुपरिचित आहे

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, संयुक्त राष्ट्रसंघ, युनेस्को यांसारख्या जागतिक पातळीवरील नावाजलेल्या संस्थांमध्ये अनेक भारतीय अर्थतज्ज्ञ वा अधिकारी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या देशाचा नावलौकिक वाढवत आहेत. यात आता एका नावाची भर पडली आहे. त्या आहेत डॉ. सौम्या स्वामिनाथन! जागतिक आरोग्य संघटनेने त्यांची उपमहासंचालक या अत्यंत जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेत एवढय़ा मोठय़ा पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय आहेत.

वैद्यक क्षेत्रात डॉ. सौम्या स्वामिनाथन हे नाव तसे सुपरिचित आहे; अगदी जागतिक पातळीवरही. सर्व जगाला भेडसावणाऱ्या एचआयव्ही आणि क्षयरोग यावर त्यांनी केलेले संशोधन विश्वभरात मान्यता पावलेले आहे. देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यानंतर शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे असे राज्यकर्त्यांना खरोखरच वाटत असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्याचा आग्रह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी धरला आहे,  भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या डॉ. सौम्या या कन्या. शालेय जीवनापासून अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थिनी अशी ओळख असलेल्या सौम्या यांनी पुण्याच्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयामधून एमबीबीएसची पदवी उच्च श्रेणीत संपादन केली. नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  दिल्लीतील अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) त्यांना प्रवेश मिळाला. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर लॉज एन्जेलिस येथील एका नामांकित रुग्णालयाची फेलोशिप मिळाली. काही वर्षे ब्रिटन, कॅलिफोर्नियामध्ये नोकरी केल्यानंतर संशोधन करण्यासाठी त्या भारतात परतल्या. सरकारी संस्थेत राहून संशोधन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. क्षयरोग आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या चेन्नई येथील संस्थेत डॉ. सौम्या या रुजू झाल्या. तेथील संशोधकांना सोबत घेऊन त्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला. क्षयरोग व एचआयव्हीबाधितांशी संवाद साधून हे रोग पसरण्याच्या कारणांचा शोध घेतला. मग त्या अनुषंगाने उपाययोजना केल्या. त्यांच्या पुढाकारानेच अनेक शहरांतून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याची मोहीम राबवण्यात आली व ती यशस्वीही ठरली.

या संस्थेचे संचालकपद भूषवल्यानंतर डॉ. सौम्या या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत (आयसीएमआर) आल्या. सध्या त्या या परिषदेच्या महासंचालक आणि भारतीय आरोग्य संशोधन विभागाच्या सचिवही आहेत. अमेरिका व अन्य प्रगत देश आरोग्य सेवेवर अफाट खर्च करतात, त्या तुलनेत आपल्याकडे सार्वजनिक आरोग्यासाठी मुळात अर्थसंकल्पात फारशी तरतूद केली जात नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकारकडे सतत निधी वाढवावा यासाठी पाठपुरावा केला. ५८ वर्षांच्या डॉ. सौम्या यांना गेल्या तीस वर्षांत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. राष्ट्रीय बाल चिकित्सा संमेलनात सर्वोत्तम शोधनिबंध सादर केल्याबद्दल लाहिरी सुवर्णपदक, भारतीय बाल रोग अकादमी, कनिष्का पुरस्कार, इंडियन असोसिएशन ऑफ अप्लाइड सायन्सचा पुरस्कार आदींचा यात समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न विविध सल्लागार समित्यांच्या त्या सदस्य आहेत. १४ देशांतील विविध प्रतिनिधींनी डॉ. सौम्या यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या मानाच्या पदावर नियुक्ती केली आहे. आजपर्यंत आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामाचा ठसा त्यांनी प्रत्येक पदावर असताना उमटवला. म्हणूनच हे नवीन पदही त्या समर्थपणे पेलतील याची खात्री वाटते..

 

First Published on October 5, 2017 3:04 am

Web Title: loksatta vyakti vedh soumya swaminathan