12 December 2017

News Flash

तनुश्री परिक

‘आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे, हे एकदा निश्चित केले

लोकसत्ता टीम | Updated: March 27, 2017 12:10 AM

‘आपल्याला  आयुष्यात नेमके काय करायचे आहे, हे एकदा निश्चित केले की, संपूर्ण ऊर्जा ते ध्येय साध्य करण्यासाठी खर्च करायची. ५२ आठवडय़ांच्या खडतर प्रशिक्षणातदेखील पुरुष सहकारी जे करू शकतात ते आपण का नाही, या जिद्दीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला..’. ही प्रतिक्रिया आहे, सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) १०५ बटालियनच्या ‘असिस्टंट कमांडंट’ पदाची धुरा हाती घेणाऱ्या तनुश्री परिक यांची. सीमा सुरक्षा दलाच्या इतिहासात तनुश्री या पहिल्या महिला लढाऊ अधिकारी. निश्चयाने काम करण्याची ऊर्मी त्यांचा लढाऊ बाणा अधोरेखित करते.

मध्य प्रदेशातील बीएसएफच्या केंद्रात ६६ पुरुष प्रशिक्षणार्थीसमवेत त्यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर पंजाबमध्ये १०५ बटालियनची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर लष्कर तैनात करता येत नाही. या सीमेची सुरक्षितता राखण्याचे दायित्व बीएसएफवर आहे. १८६ बटालियनचा अंतर्भाव आणि तब्बल अडीच लाख मनुष्यबळ असणारी बीएसएफ हे आंतरराष्ट्रीय सीमेचे संरक्षण करणारे जगातील सर्वात मोठे दल म्हणून ओळखले जाते. त्यात लढाऊ भूमिकेत दाखल होणाऱ्या तनुश्री या पहिल्याच महिला अधिकारी आहेत. २५ वर्षीय तनुश्री यांना घरातून लष्करी सेवेचा वारसा नाही. त्यांचे वडील डॉ. एस. पी. जोशी हे पशुचिकित्सक तर आई मंजू  गृहिणी. राजस्थानमधील बिकानेर हे तनुश्री यांचे मूळ गाव. सोफिया महाविद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण झाले. बीएसएफची लहानपणापासून प्राथमिक ओळख झाली होती. कारण बिकानेरमध्ये बीएसएफ मुख्यालयाजवळ परिक यांचे घर आहे. गणवेशातील अधिकारी व जवानांची कार्यपद्धती आणि शिस्तबद्ध जीवनाविषयी कमालीचे अप्रूप वाटायचे. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी राष्ट्रीय छात्रसेना पथकात (एनसीसी) सहभाग घेतला. बिकानेरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयात बी. टेक. पदवी प्राप्त केली. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ग्रामीण विकास विषयाचे शिक्षण घेतले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१४ मध्ये घेतलेल्या प्रवेश परीक्षेत त्यांनी यश मिळविले. महिलांच्या यादीत तनुश्री तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांची स्वत:ची सीमा सुरक्षा दलात जाण्याची प्रबळ इच्छा होती. पहिल्या दोन्ही महिला परीक्षार्थीनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा पर्याय निवडला. यामुळे बीएसएफमध्ये दाखल होण्याचा पर्याय निवडण्याची संधी मिळाली आणि तनुश्री या दलातील पहिल्या महिला लढाऊ अधिकारी ठरल्या. सद्य:स्थितीत सीमेचे संरक्षण करताना घुसखोरी रोखणे हे बीएसएफसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. ‘बीएसएफ’ने शत्रूशी दोन हात केल्याचा इतिहास आहे. प्रत्यक्ष सीमेवर काम करताना तनुश्री या ही आव्हाने तितक्याच सक्षमतेने पेलून देशातील युवतींना लढाऊ सेवेकडे आकृष्ट करतील, हे निश्चित.

 

First Published on March 27, 2017 12:10 am

Web Title: loksatta vyakti vedh tanushree parikh