09 July 2020

News Flash

मधुवंती दांडेकर

कलावंत व रसिक यांच्यातील कलात्मक देवघेव म्हणजे नाटक अशी धारणा असलेल्या मधुवंती यांनी विपुल लेखनही केले आहे.

मधुवंती दांडेकर

 

चित्रपटांचे आव्हान आणि मराठी नाटकाचा बदलता परीघ यांमुळे मराठी संगीत रंगभूमीस आलेल्या पडत्या काळातही संगीत रंगभूमीशी एकनिष्ठ राहिलेल्या गायिका-अभिनेत्री म्हणून मधुवंती दांडेकर यांचे नाव घ्यावे लागेल. केवळ मराठीच नाही तर उर्दू आणि गुजराती रंगभूमीवर त्यांनी काम केले. कलावंत व रसिक यांच्यातील कलात्मक देवघेव म्हणजे नाटक अशी धारणा असलेल्या मधुवंती यांनी विपुल लेखनही केले आहे. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ संगीत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या मधुवंती दांडेकर निरपेक्ष वृत्तीने विद्यादान करीत आहेत. मातोश्री मनोरमा सहस्रबुद्धे यांच्याकडून गायनाचा वारसा मिळालेल्या मधुवंती यांनी पं. ए. के. अभ्यंकर, स्वरराज छोटा गंधर्व, पं. राम मराठे, जयमाला शिलेदार, पं. यशवंतबुवा जोशी अशा दिग्गजांकडून संगीताचे शिक्षण घेतले. छोटा गंधर्वानी त्यांना शास्त्रीय संगीत, नाटय़संगीत, ठुमरी, दादरा यांसह अनेक चिजा शिकविल्या. संगीत रंगभूमीवर त्यांचा प्रवेश पती मोहन यांच्या आग्रहामुळेच झाला. अनेक जुनी संगीत नाटके त्यांनी नव्याने गाजवली. ‘लोकसत्ता’चे माजी संपादक व ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या ‘रंगशारदा’ संस्थेच्या नाटकांतील भूमिकांमुळे मधुवंती यांची कारकीर्द घडली. ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘मदनाची मंजिरी’ व ‘ध्रुवाचा तारा’ या नाटकांतील त्यांचा अभिनय रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे. ‘मदनाची मंजिरी’ नाटकातील ‘ऋतुराज आज वनी आला’ ही एचएमव्हीने काढलेली त्यांची पहिलीच तबकडी (रेकॉर्ड) लोकप्रिय झाली. पुढे, ‘तारिणी नववसनधारिणी’ आणि ‘मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला’ या नाटय़पदांच्या तबकडय़ाही रसिकप्रिय ठरल्या. विद्याधर गोखले यांच्या ‘गज़्‍ालांचा गुलशन’ या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यांना एका उर्दू नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्या खास उर्दू शिकल्या. ती भूमिका त्यांनी इतकी छान वठवली की, अनेक उर्दू भाषकांना मधुवंती दांडेकर यांची मातृभाषा उर्दूच आहे, असे वाटले. पुढे ‘संगीत सुवर्णतुला’चे गुजराती रूपांतर रंगभूमीवर आले, तेव्हा ‘रुक्मिणी’साठी नाटकाच्या निर्मात्याने मधुवंती दांडेकर यांनाच गळ घातली.  सर्व संवाद देवनागरीत लिहून घेत पाठ करून, गुजरातीचा गंधही नसताना त्यांनी ही भूमिका उत्तम वठवली. बालगंधर्व हे मधुवंती दांडेकर यांचे संगीतातले आदर्श. अ.भा. मराठी नाटय़ परिषदेचा गुणगौरव पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या मधुवंती दांडेकर यांना राज्य शासनाचा संगीताचार्य अण्णासाहेब किलरेस्कर पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या सांगीतिक कर्तृत्वावर  राजमान्यतेची मोहोर उमटली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:01 am

Web Title: madhuvanti dandekar profile abn 97
Next Stories
1 गुलाबबाई संगमनेरकर
2 रॉबर्ट झाटोरी
3 डॉ. रतन लाल
Just Now!
X