News Flash

महाबळेश्वर सैल

ते मूळचे कर्नाटकच्या कारवार जिल्ह्य़ातील माजळी गावचे.

भारतात पश्चिम बंगालमधील पुरुत्थानाच्या काळात म्हणजे एकोणिसावे शतक व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कादंबरीलेखनास सुरुवात झाली असे म्हटले जाते; परंतु प्रत्यक्षात आशियातील पहिला छापखाना गोव्यात सुरू झाला होता, तसेच त्या राज्याला फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्यासारख्या व्हिक्टर ह्य़ुगोपासून प्रेरणा घेतलेल्या काही बहुआयामी लेखकांची परंपरा होती. त्यामुळे गोव्याच्या मातीतील सकस साहित्याला पूर्वपीठिका आहे. याच राज्यातील कोकणी साहित्यिक महाबळेश्वर सैल यांच्या ‘हावठण’ या कादंबरीची ‘सरस्वती सन्माना’साठी निवड झाली आहे.

ते मूळचे कर्नाटकच्या कारवार जिल्ह्य़ातील माजळी गावचे. मराठीत त्यांची चार नाटके व एक कादंबरी प्रसिद्ध आहे. कोकणीत त्यांनी पाच लघुकथासंग्रह व सात कादंबऱ्या लिहिल्या आहेत. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला संवेदनशीलता असतेच, पण ती साहित्यात उतरण्यासाठी सर्जनशील लेखनाचा गुण त्याच्यात असतोच असे नाही. महाबळेश्वर सैल यांच्यात ते वेगळे मिश्रण सापडते. त्यांनी कोकणी भाषेत निसर्गसाहित्य नावाचा नवा प्रवाह रूढ केला. महाबळेश्वर सैल हे माजी सैनिक असून ते १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात लढले होते, तर १९६३-६४ मध्ये इस्रायल-इजिप्त सीमेवर युनोचे शांतिसैनिक म्हणून गेले होते. ‘हावठण’ ही कादंबरी मातीपासून भांडी बनवणाऱ्या नामशेष होत चाललेल्या कुंभार समाजाची सांस्कृतिक पाश्र्वभूमी अधोरेखित करते. ‘काळी गंगा’ ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ‘तांडव’ ही त्यांची कादंबरी मराठी व कोकणी अशा दोन्ही भाषांतून आहे. राजहंस प्रकाशनने ती वाचकांसमोर आणली. ‘खोल खोल मुळा’, ‘निमाणो अश्वत्थामा’ (शेवटचा अश्वत्थामा), ‘नको जाळू माझं घरटं’, ‘विखार विळखो’, ‘अरण्यकांड’, ‘पालताडचो मुनिस’ (यावर त्याच नावाचा चित्रपट आहे) ही पुस्तके त्यांनी लिहिली. साहित्य अकादमी पुरस्कार, विमला पै विश्व कोकणी साहित्य पुरस्कार, गोवा कला अकादमी पुरस्कार, गोवा सरकारचा सांस्कृतिक पुरस्कार असे मानसन्मान त्यांना मिळाले. साहित्य अकादमी, कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी, गोवा कला अकादमी या संस्थांचे ते सदस्य होते व नंतर अखिल भारतीय कोकणी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद २००५ मध्ये त्यांनी भूषवले. त्यांच्या ‘तांडव’ या कादंबरीतून गोव्यात पोर्तुगीजांच्या काळात झालेला धर्मच्छल व धर्मातर हा स्फोटक विषय हाताळला आहे. त्यांच्या लेखनातून दोस्तोवयस्कीच्या शैलीची आठवण येते. आजचा गोवा कसा आहे व तो तसा का आहे, त्याची घडण कशी झाली, संघर्षकाळातही हिंदू व ख्रिश्चन धर्मीयांनी आंतरिक मूल्ये कशी जपली याचे वर्णन त्यात येते. त्यांच्या ‘युगसांवार’ या कोकणी कादंबरीचे यानिमित्ताने मराठीत रूपांतर झाले. १९७२ मध्ये सैल यांची पहिली कथा आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’मध्ये छापून आली होती. त्यानंतर चाळीस वर्षे त्यांचे लेखन सुरू आहे. कोकणीतील ‘युगसांवार’ व मराठीतील ‘तांडव’ या कादंबऱ्यांसाठी सैल यांनी १० वर्षे संशोधन केले व साडेचारशे वर्षांपूर्वीच्या इतिहासात परिवेश करण्याचे आव्हान पेलले. अमली पदार्थ व व्यसन म्हटले, की पंजाबचे नाव पुढे येते; पण गोव्यात किनारी भागात व्यसनाधीनता अधिक आहे. ती आता तरुणांमध्ये येत आहे, यावर त्यांनी ‘विखार विळखो’ ही कोकणी कादंबरी लिहिली. त्यांचे लेखन बरेच व्यापक असले तरी त्यातील ‘तांडव’ ही कादंबरी महत्त्वाची ठरते. त्यात त्यांनी लोकभाषेतील शब्द वापरतानाच आजूबाजूच्या निसर्गाचे समर्पक वर्णन केले आहे. इतिहासाचा अपलाप न करता त्यांनी ही प्रभावी कादंबरी लिहिली. मराठीतील श्रेष्ठ कादंबऱ्यांमध्ये तिची गणना होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2017 2:24 am

Web Title: mahabaleshwar sail
Next Stories
1 डॉ. वि. भा. देशपांडे
2 नीता देस्वाल
3 रवि राय
Just Now!
X