News Flash

मंगला बर्वे

चविष्ट खाद्यपदार्थ बनविणे ही एक प्रयोगशीलता असते.

स्वयंपाक चवदार झाला, खवय्यांची रसना तृप्त झाला आणि प्रत्येक पदार्थाला वाहवा मिळाली की चूल, स्टोव्ह, गॅस आणि अगदी मायक्रोवेव्हच्या जमान्यातील स्त्रीला भरून पावल्यासारखे वाटते. पुढे जमाना आणखी बदलला. चवदार पाककृती बनविणे ही महिलांची मक्तेदारी राहिली नाही. आपल्या हातालाही चव असावी, आपल्यालाही चांगले, चवदार, पदार्थ बनवता येतात, हे सांगताना पुरुषांनाही अभिमान वाटू लागला, आणि मराठमोळ्या, घरगुती खाद्यपदार्थाची प्रतिष्ठाही वाढत गेली. ही खरे तर परिवर्तनाची प्रक्रिया होती, ती पेलणाऱ्यांच्या ज्या ज्या हातांना ही पाककलेची सिद्धी प्राप्त झाली, त्यामध्ये मंगला बर्वे हे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. चविष्ट खाद्यपदार्थ बनविणे ही एक प्रयोगशीलता असते. त्यामुळे त्यामध्ये बदलत्या काळाचे प्रतिबिंब असते. काळाचा हा सूक्ष्म बदल स्वयंपाकघरातूनच सुरू होतो, हे ओळखून मंगलाताईंनी नव्या जुन्या खाद्यपदार्थाची अशी काही चवदार सांगड घातली, की आजोबांपासून नातवांपर्यंत घरातल्या सर्वानी त्यांच्या पुस्तकातील एकूण एक पदार्थ सारख्याच चवीने चाखला. कुणी त्या पदार्थातील आईच्या हातच्या चवीच्या आठवणीने हळवा झाला, तर कुणी त्या पदार्थाची चव जिभेवर कोरून ठेवली.

बटाटय़ापासून पालेभाज्यांपर्यंत, आणि धान्यांपासून कडधान्यांपर्यंत प्रत्येक पदार्थाला चव आणि अनोखा स्वाद असतो. त्यामध्ये पाकसिद्धीचे कौशल्य पणाला लावले, थोडासा जिव्हाळा जोडीला दिला, की कोणताही पदार्थ चवदारच होतो, हा विश्वास मंगलाताईंच्या असंख्य पुस्तकांमधील पाककृतींनी दिला. आजही मंगला बर्वे यांच्या ‘अन्नपूर्णा’ची प्रत असंख्य घरांत हाताशी सहजपणे मिळेल अशा मोक्याच्या जागीच असते, हे त्या सिद्धहस्त लेखणीचे मोठे यश आहे. सुग्रास स्वयंपाक ही खऱ्या अर्थाने पारंपरिक सिद्धी आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असताना, मुलींना घरातच ती प्राप्त होत असे. मात्र, त्या त्या घरात परंपरेने चालत असलेल्या पदार्थापुरताच हा बाज मर्यादित असायचा. सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती बदलत गेली, स्वयंपाकघरातील महिला नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडली, आणि स्वयंपाकघरातील वावर कमी होत गेला. पाकसिद्धीची तपश्चर्या कमी होत गेली, आणि अशा वेळी आपोआपच अनेक हातांना मंगलाताईंच्या पुस्तकांचा आधार गवसला. झटपट होणाऱ्या खाद्यपदार्थाबरोबरच, परंपरेने चालत आलेले पदार्थ सहज बनविण्याचा ‘हातखंडा मंत्र’ या पुस्तकांमधून मिळत गेला.

संसारसुखाचा जन्म स्वयंपाकघरात होतो असे म्हणतात. मंगलाताईंच्या पुस्तकांमुळे हजारो मराठमोळ्या घरांना संसाराचे सौख्य मिळवून दिले. आता तर सातासमुद्रापारच्या मराठमोळ्या कुटुंबांची मराठी संस्कृती टिकविण्याची आसही या पुस्तकांमुळे पूर्ण होत आहे. मंगला बर्वे या केवळ पाकसिद्धी प्राप्त झालेल्या सुगरण नव्हत्या, तर १९८०च्या दशकानंतर असंख्य स्त्री-पुरुषांना पाकसिद्धी प्राप्त करून देणाऱ्या सिद्धहस्त माध्यम होत्या. त्यांच्या पुस्तकांमुळे आणखीही अनेक पिढय़ांपर्यंत त्यांचे नाव घराघरांत परिचित राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2016 4:22 am

Web Title: mangala barve
Next Stories
1 जुन्को ताबेई
2 सर डेव्हिड कॉक्स
3 डॉ. रेणू खटोड
Just Now!
X