04 March 2021

News Flash

मरियप्पन थांगवेलू

थांगवेलू याने जिद्द व झगडण्याची वृत्ती त्याच्या आईकडूनच घेतली असावी.

शारीरिकदृष्टय़ा सुदृढ असलेल्या लोकांनाही अभिमान वाटावा अशी कामगिरी भारताच्या  मरियप्पन थांगवेलू या दिव्यांग खेळाडूने करून दाखवली  आहे. सहसा पॅरालिम्पिकमध्ये आपले खेळाडू फारसे चमकत नाहीत. मात्र थांगवेलू याने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये  उंच उडीत सुवर्णझेप घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा आजपर्यंतचा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी मुरलीकांत पेटकर (१९७२- जलतरण) व देवेंद्र झाझरिया (२००४- भालाफेक) यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

थांगवेलू याने जिद्द व झगडण्याची वृत्ती त्याच्या आईकडूनच घेतली असावी. तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्य़ातील पेरियावादागाम्पती या खेडेगावातील रहिवासी. त्याच्यासह चार मुले व एक कन्या यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्याच्या आईलाच करावी लागत असे. पाच अपत्यांना व पत्नीला वाऱ्यावर सोडून त्याचे वडील  बेपत्ता झाले. वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या मरियप्पनच्या आईने जिद्दीने या सर्वाना वाढविले. मरियप्पन हा केवळ पाच वर्षांचा असताना त्याला अपघात झाला. तो शाळेत जात असताना एका बसचालकाने त्याला उडविले. या अपघातात मरियप्पन याला उजवा पाय गमवावा लागला. त्याला कायमचे अपंगत्व आले. त्याच्या आईने या संकटासही धैर्याने तोंड दिले. दोन-चार पैसे मिळायला लागल्यानंतर तिने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. धाडस, जिद्द व स्वाभिमान आदी गोष्टींचे बाळकडू मरियप्पन याला मिळाले नाही तरच नवल. शाळेत असताना तो अन्य मुलांबरोबर व्हॉलीबॉल खेळत असे. व्हॉलीबॉलमध्ये स्मॅशिंगचा फटका मारत असताना तो खूप उंच उडी मारत असे. हे त्याच्या शाळेतील शारीरिक शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी मरियप्पन याला उंच उडीचा सराव करण्याचा सल्ला दिला. त्याने हा सल्ला मानला आणि उंच उडीचा सराव सुरू केला. दिव्यांगत्व येऊनही त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले एवढेच नव्हे तर त्याने व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी चांगल्या गुणांमध्ये प्राप्त केली. हे शिक्षण सुरू असताना त्याने उंच उडीच्या सरावात खंड पडू दिला नाही. दिव्यांग असले म्हणून निराश न होता संकटांना आत्मविश्वासाने सामोरे गेले तर अनपेक्षित यश मिळविता येते हे त्याने दाखवून दिले. शिक्षण व क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. जर इच्छाशक्ती असेल तर या दोन्ही क्षेत्रांवर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येते याचा परिपाठ त्याने घालून दिला आहे. पॅरालिम्पिक  क्रीडाप्रकारात करिअर करतानाही त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.

कोणत्याही परदेशी प्रशिक्षकाची मदत न घेता व कोणत्याही जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध नसताना त्याने रिओ येथे तिरंगा ध्वज फडकाविला. सवलती व सुविधा नसल्याची कोणतीही तक्रार न करता त्याने हे यश मिळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 2:14 am

Web Title: mariyappan thangavelu
Next Stories
1 डॉ. एच. व्ही. तुलसीराम
2 नलेश पाटील
3 अंजूम चोप्रा
Just Now!
X