News Flash

मरी फ्रेडरिक्सन

मरी फ्रेडरिक्सन यांचे नाव या बॅण्डची गायिका म्हणून युरोप आणि अमेरिका खंडात दुमदूमू लागले.

मरी फ्रेडरिक्सन

हिंदी चित्रपट संगीतात साठोत्तरी काळात बदल झाला; तो तत्कालीन तरुण पिढीने अगदी नवकथा- नवनाटक- नवसिनेमासारखा आपलासा केला. मात्र, या नव्या बदलांमागील आंतरराष्ट्रीय प्रेरणांचा मागमूसही नसलेल्या श्रवणभक्तांनी काही संगीतशर्विलकांना थोरपद बहाल करून देव्हाऱ्यातच नेऊन बसविले. ‘अबा’ या स्वीडिश बॅण्डने संगीतबद्ध केलेली किती तरी गाणी आपल्याकडे ‘अजरामर’ वगैरे म्हटल्या जाणाऱ्या गीतयादीत आहेत. भारतातल्या अशा अनेक ‘महान’ संगीतकारांची कर्तुकी यूटय़ूबोत्तर काळात उघडी पडली. ‘अबा’ या बॅण्डइतकीच लोकप्रियता जगभरात मिळविणाऱ्या स्वीडनच्या ‘रॉक्सेट’ या संगीतसमूहाच्या गाण्यांतील चाली आपण बेमालूमपणे हिंदी रूपात ऐकल्या आहेत. ‘रॉक्सेट’ बॅण्डचा आवाज आणि चेहरा असलेल्या मरी फ्रेडरिक्सन यांचे गेल्या आठवडय़ात प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

पश्चिमेत मायकेल जॅक्सन आणि आपल्याकडे बप्पी लाहिरींच्या डिस्को बीट्सचा धुमाकूळ सुरू असण्याच्या काळात ‘रॉक्सेट’ या स्वीडिश बॅण्डचे शुद्ध रॉक संगीत उदयाला आले. इलेक्ट्रिक गिटारवरील कर्कशवजा धून, कोरसचा अद्भुत वापर आणि ध्वनिमुद्रण तंत्रात झालेल्या प्रगतीचा गाणी फुलविण्यासाठी केलेल्या वापरामुळे हीट गाण्यांचा धडाका या बॅण्डने लावला. मरी फ्रेडरिक्सन यांचे नाव या बॅण्डची गायिका म्हणून युरोप आणि अमेरिका खंडात दुमदूमू लागले. स्वीडनमधील एका खेडय़ात गरीब कुटुंबात जन्मलेल्या गन-मरी फ्रेडरिक्सन यांनी चर्चमध्ये गाणे आणि वाद्यवादनाचे धडे घेऊन संगीतात प्रावीण्य मिळविले. स्वत:च्या स्वरावली आणि शब्दावलींच्या आधारे देशातील विविध संगीतसमूहांमध्ये त्यांची उमेदवारी सुरू होती. पर गेस्ले या स्वीडनमधील गिटारवादकाशी त्यांची ओळख झाली आणि या दोघांनी १९७८ मध्ये ‘रॉक्सेट’ या बॅण्डची स्थापना केली. एक तपामध्ये या बॅण्डने ‘द लुक’, ‘जॉयराइड’, ‘इट मस्ट हॅव बीन लव्ह’, ‘लिसन टू युवर हार्ट’ अशी वेड लावणारी गाणी तयार केली. यातल्या ‘द लुक’ या गाण्याची नव्वदच्या दशकात ‘दुनिया में जिना है तो’ (‘योद्धा’), ‘दिल में कुछ होने लगा’ (‘आर्मी’) अशी दोन वेगवेगळ्या संगीतकारांनी गमतीशीर व्हर्शन केली. भारतीय विश्वसुंदरी निवडली गेल्यानंतरच्या काळात अनेक सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये ‘द लुक’ गाणे वापरले जात होते. २००२ साली मरी फ्रेडरिक्सन यांना मेंदूचा असाध्य आजार जडला. पण खचून न जाता आजारावर मात करण्यासाठी नवे संगीत करण्याचा मार्ग त्यांनी वापरला. आजारकाळातही त्यांनी तीन नवे अल्बम तयार करीत शैलीसंपन्न गाणी सादर केली. नेहमी सकारात्मकता पेरणारी गाणी दिल्यामुळे त्यांच्या निधनानंतर जगभरातील संगीतवर्तुळात प्रगट झालेली हळहळ  सारख्याच प्रमाणात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2019 1:11 am

Web Title: mary frederickson profile zws 70
Next Stories
1 अ‍ॅना करिना
2 सायरस होमी छोटिया
3 गीता सिद्धार्थ
Just Now!
X