काश्मीरमधून येणाऱ्या रोजच्या बातम्या तशा खिन्न व्हायला लावणाऱ्या. मध्यंतरीच्या काळात तरुणांनी सुरक्षा दलांवर दगडफेकीचे जे सत्र अवलंबले होते, त्यात या पिढीला कुठले भवितव्य आहे हा प्रश्न सर्वानाच अस्वस्थ करीत राहिला. पाकिस्तानच्या चिथावणीखोरपणामुळे आपल्याच हिताची होळी करण्यात तरुण धन्यता मानत आहेत, या सगळ्या अंधारातूनही एक प्रकाशाची ज्योत तेवताना दिसली. तिचे नाव इरम हबीब. ही तरुणी त्याच समाजातली. त्याच परिस्थितीत वाढलेली पण सर्व अडचणींवर मात करून तिने गगनभरारी घेतली. काश्मीरची पहिली मुस्लीम महिला वैमानिक म्हणून तिचे नाव गौरवाने घेतले जात आहे. यात केवळ महिला म्हणून विचार करण्याचा भाग नाही तर काश्मीरमधील सगळ्या तरुण पिढीने तिच्या संघर्षांची मुक्तकंठाने स्तुती करायला हवी.

इतरांप्रमाणेच तीही पुराणमतवादी मुस्लीम घरात जन्मलेली. तिचे वडील सरकारी रुग्णालयांना शस्त्रक्रियेसाठी लागणारी व इतर उपकरणे पुरवण्याचा व्यवसाय करतात.  २०१६ मध्ये तिने मियामीतून विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. २०१६ मध्ये काश्मिरी पंडित असलेली तन्वी रैना ही काश्मीरमधील पहिली महिला वैज्ञानिक ठरली. गेल्या वर्षी आयेशा अझीज हिने भारतातील सर्वात तरुण विद्यार्थी वैमानिकाचा मान पटकावला, पण ती व्यावसायिक वैमानिक नाही. आता इरम ही व्यावसायिक वैमानिक झाल्यानंतर खासगी विमान सेवेत जाणार आहे. तिला फॉरेस्ट्री (जंगले) या विषयात पीएचडी करायची होती, पण तो इरादा तूर्त सोडून ती वैमानिक बनली आहे. लहानपणापासून वैमानिक होण्याची तिची इच्छा होती. वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी तिला सहा वर्षे आई-वडिलांचा पिच्छा पुरवावा लागला. नंतर तिने डेहराडूनमध्ये पदवी घेतली. या सगळ्या खटाटोपात तिने मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र शोधण्यापासून सगळी धडपड स्वत: केली. आई-वडिलांना या निर्णयावर राजी करणे सर्वात कठीण होते, पण तिने त्यात यश मिळवले. सध्या पन्नास काश्मिरी महिला वैमानिकाचे प्रशिक्षण घेत आहेत. ही बदलाची एक सुरुवात आहे, अनेकदा क्रीडा क्षेत्रातही काश्मिरी मुलांची नावे येतात व मागे पडतात, पण तसे होता कामा नये. देशाशी नाते जोडण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे हेच मार्ग आहेत. बदलाची ही सुरुवात आहे. त्याला सर्वाच्या कौतुकाची गरज आहे, मुस्लीम कर्मठ कुटुंबातील एका मुलीने वैमानिक होण्याचा मानस बाळगला आणि तो पूर्ण करण्यात अखेर तिच्या वडिलांचीही साथ लाभली. यातून प्रकाशाची तिरीप तरी दिसते आहे, अजून अशा असंख्य पणत्या उजळत आहेत, संधीची आस त्यांनाही आहे, ती मिळण्याचा फक्त अवकाश, बाकी तर सारी क्षितिजे खुलीच आहेत.