13 December 2018

News Flash

एम व्ही पैली

‘स्वरम् नन्नयिरिकुम्पोल’ हे त्यांचे आत्मपर पुस्तक केवळ मल्याळम्मध्येच उपलब्ध आहे.

एम व्ही पैली 

केरळमधील एका प्रख्यात विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राज्यघटनाविषयक अनेक पाठय़पुस्तकांचे तसेच कामगार कायदे आणि मनुष्यबळ विकास या विषयावरील पुस्तकांचे लेखक, देशभरातील अनेक विद्यापीठांचे तसेच केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित उच्चशिक्षण संस्थांचे सल्लागार, केरळमध्ये व्यवस्थापन-अभ्यासक्रमांची पायाभरणी करणारे द्रष्टे शिक्षण-व्यवस्थापक आणि २००६ मध्ये ‘पद्मभूषण’ या किताबास पात्र ठरलेले शिक्षणतज्ज्ञ अशी डॉ. एम. व्ही. पैली यांची विविधांगी ओळख होती. वयाच्या ९८ व्या वर्षी, ३० डिसेंबर रोजी ते कालवश झाले.

त्यांचे पूर्ण नाव मूलमत्तम् वर्के पैली. पाच ऑक्टोबर १९१९ चा त्यांचा जन्म. आलपुळा (आलेप्पी) जिल्ह्यातील पुलिकुन्नू या बेटवजा गावात कॉन्व्हेन्ट शाळा असल्याने तेथेच त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. उच्चशिक्षणासाठी मात्र ते थेट लखनऊ विद्यापीठात गेले. तेथे कलाशाखेतील पदव्युत्तर पदवी घेऊन, हार्वर्ड विद्यापीठाची एलएल.एम. ही कायद्यातील उच्च पदवी त्यांनी मिळविली. त्यांनी १९६२ मध्ये लिहिलेले ‘इंटरनॅशनल जॉइंट बिझनेस व्हेंचर्स’ हे पुस्तक अमेरिकेतील ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस’ने प्रकाशित केले, तर अन्य पुस्तकांपैकी सात पुस्तके भारतीय राज्यघटनेचा विविधांगी अभ्यास करणारी आहेत. इंग्रजीसोबत मल्याळम् भाषेतही पैली आवर्जून लिहीत. शीतयुद्धकालीन अमेरिकेत शिकलेले पैली पुढे चर्चासत्रांनिमित्त रशियाभेटीस जाऊन प्रभावित झाले. त्या अनुभवांवर आधारलेले त्यांचे पुस्तक या दोन्ही भाषांत प्रकाशित झाले आहे. ‘स्वरम् नन्नयिरिकुम्पोल’ हे त्यांचे आत्मपर पुस्तक केवळ मल्याळम्मध्येच उपलब्ध आहे.

कायदा आणि व्यवस्थापन यांचे जाणकार असलेल्या पैली यांनी लखनऊ, पाटणा, दिल्ली येथे प्राध्या पैकी केली. पण शिक्षणक्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व खुलले, ते केरळमधील ‘क्युसॅट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोची (कोचीन) येथील विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठात. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अध्ययनातून पुढे व्यवस्थापन शाखेकडेही विद्यार्थ्यांनी जावे, ही कल्पना त्यांनी १९७७ मध्ये मांडली आणि १९७०चे दशक संपण्यापूर्वी अमलातही आणली हे त्यांचे खरे कर्तृत्व. केरळमधील पहिला व्यवस्थापन अभ्यासक्रम त्यांच्या आग्रहामुळे ‘क्युसॅट’मध्ये सुरू झालाच, पण पुढे कित्येक भारतीय विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या उच्चशिक्षणानंतर व्यवस्थापनही शिकणे आवश्यक मानले.

शिस्तबद्धपणे अथक काम करणारे पैली उतारवयातही कार्यरत राहिले. हैदराबादच्या ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज’मधील अभ्यागत व्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. ‘क्युसॅट’मधून निवृत्तीनंतर ते कोचीमधील ‘आशियाई विकास व उद्योजकता संस्थे’च्या प्रमुखपदी राहिले. देशभरच्या शिक्षण क्षेत्राची नेमकी नस ओळखून, गुणी प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्युसॅट’मार्फत त्यांनी ‘एम व्ही पैली पुरस्कार’ सुरू करविला. रोख लाखभर रुपये आणि मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.

First Published on January 2, 2018 1:27 am

Web Title: mv paili