वयाच्या सोळाव्या वर्षी, १९४९ मध्ये रुपेरी पडद्यावर झळकणारी नवाब बानू म्हणजेच निम्मी ही अभिनेत्री नशीबवानच. मूकपटाचा बोलपट होता होताच स्त्रियांना त्यांच्याच भूमिका करण्याची संधी देऊन भारतीय चित्रपट सामाजिकदृष्टय़ा खूपच पुढारलेला होता. समाजात ‘नटी’ या शब्दाचे संदर्भही बदलू लागले असताना निम्मीने पडद्यावर आगमन केले. त्यानंतर नटीची ‘अभिनेत्री’ झाली आणि समाजात लोकप्रियतेच्या जोरावर वाहवा मिळवणाऱ्या त्या काळातल्या म्हणजे साठच्या दशकातील अन्य अभिनेत्रींमध्ये निम्मीही पुढेच राहिली. त्याचे कारणही वेगळे होते. निम्मीने चित्रपटांमध्ये ग्रामीण भागातील चुणचुणीत युवतीचे दर्शन घडवले आणि त्याने त्या काळातील प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ घातली. पण निम्मीच्या वाटय़ाला खूप वेगवेगळ्या भूमिकाही आल्या. हे वैविध्य तिच्यासाठी आव्हानात्मक ठरले; तिनेही त्याचे सोने केले. कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यातील ती एक आघाडीची अभिनेत्री ठरली. आग्रा येथील मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या निम्मीची आई वहिदा त्या काळातली अभिनेत्री होती आणि गायिकाही. वडील अब्दुल हकीम हे सेनादलासाठी कॉन्ट्रॅक्टर होते. पण नवाब बानूचे निम्मी हे नाव मात्र तिला राज कपूर यांनी दिले. वयाच्या अकराव्या वर्षी पितृछत्र हरवले. तसेही ते दुसऱ्या शहरात राहत असल्याने तिचा त्यांच्याशी तसा संबंधही नव्हता. त्या वेळी मुंबईत येऊन चित्रपटाच्या रुपेरी दुनियेत झळकणे म्हणजे काय, याची फारशी कल्पनाही नसताना निम्मी या व्यवसायात उतरली. पण तिची बहीण या शहरात राहत असल्याने तिला कुटुंबाचा आधारही होता. मेहबूब खान यांच्यासारख्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने निम्मीला अंदाज या चित्रपटाची निर्मिती कशी होते हे पाहायला बोलावले. त्या सेटवर तिला राज कपूरही भेटले. त्यामुळे ‘बरसात’ या चित्रपटात तिला भूमिकाही मिळाली. हा तिचा पहिला चित्रपट. त्यानंतर तिला एकदमच भाव मिळू लागला. तिचे सारे आयुष्यच बदलून गेले. दुय्यम भूमिका करत राहूनही तिला सतत प्रकाशझोतात राहता आले. राज कपूर, देव आनंद, दिलीपकुमार यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने तिच्या लोकप्रियतेतही मोठीच भर पडली. पण मधुबाला, नर्गिस, सुरैया, गीता बाली, मीना कुमारी यांच्यासारख्या त्या काळात तुफान प्रेक्षकप्रिय अभिनेत्रींसह काम करण्याच्या संधीतील आव्हानही  निम्मीने नेमके पेलले. सतत प्रकाशात राहण्याची ही सवय काळापुढे टिकू शकत नाही. तिनेही या व्यवसायातून निवृत्त होऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि ती सहजपणे पडद्यावरून नाहीशी झाली. ‘लव्ह अँड गॉड’ या तिच्या शेवटच्या चित्रपटाचे चित्रीकरण १९६३ मध्येच सुरू झाले. पण तो प्रदर्शित झाला १९८६ मध्ये. इतक्या वर्षांनंतरही तिची ओळख प्रेक्षकांच्या मनातून पुसली गेली नाही, हेच तिचे श्रेयस आणि प्रेयस होते. तिच्या निधनाने एक चांगली अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे.