News Flash

राजेंद्र किशोर पण्डा

ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यात १९४४ साली राजेंद्र किशोर पण्डा यांचा जन्म झाला.

गेल्या शतकात, स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशात ‘सत्यवादी दल’ हा भारतीय संस्कृतीचा अभिमानी प्रवाह आणि ‘सबूज दल’ हा आधुनिकतेच्या संक्रमणावस्थेतील प्रवाह साहित्यविश्वात प्रबळ होता. पण कार्ल मार्क्‍स आणि सिग्मंड फ्रॉइड यांच्या तत्त्वविचारांची ओळख होऊ लागली तशी इतर भाषित प्रांतांप्रमाणे ओडिशातही नवसाहित्याचा प्रवाह खळखळू लागला. साठच्या दशकात आधुनिक दृष्टिकोनाची कविता लिहिणारे मनोज दास असोत वा ‘अप्रीतिकर कबिता’ या काव्यसंग्रहातून बंडखोरपणा दाखविणारे रवींद्र सिंह असोत वा ब्रजमोहन महांती, शची राउतराय, गोविंद दास यांच्यासारखे त्याच काळातले अन्य कवी; मराठीतील साठोत्तरी कवितेला समांतरपणे ओडिया कवितेत या मंडळींनी आधुनिकता आणली. त्यानंतरच्या पिढीत, या आधुनिकतेचे पुरेपूर भान कायम ठेवत व्यक्त होणारे कवी म्हणून राजेंद्र किशोर पण्डा यांची ओळख आहे. गेल्या शतकातील कन्नडमधील थोर कवी कुप्पाली वेंकटाप्पा पुटप्पा अर्थात कुवेम्पु यांच्या नावाने २०१३ सालापासून दिला जाणारा ‘कुवेम्पु राष्ट्रीय पुरस्कार’, २०२० या वर्षांसाठी राजेंद्र किशोर पण्डा यांना अलीकडेच जाहीर झाला, अन् कन्नड-ओडिया आधुनिकतेचे बंध जुळून आल्याची भावना भारतीय कवितेच्या चाहत्यांमध्ये व्यक्त झाली.

ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यात १९४४ साली राजेंद्र किशोर पण्डा यांचा जन्म झाला. साठच्या दशकात हिराकुड धरण प्रकल्पात जी २८५ गावे आणि तब्बल २२ हजार कुटुंबे विस्थापित झाली, त्यात पण्डा यांचे नताशा गाव आणि अर्थातच कुटुंबही होते. विस्थापितपणाच्या जखमा मनावर कोरल्या गेलेल्या पण्डा यांचे उच्च शिक्षण अलाहाबाद विद्यापीठात झाले. तिथून कला शाखेत पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर १९६७ साली पण्डा भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. २००४ पर्यंत प्रशासकीय सेवेत विविध पदांवर ते कार्यरत राहिले. शाळेत असल्यापासूनच पण्डा यांच्या कविता राज्यस्तरीय नियतकालिकांत प्रसिद्ध होत होत्याच, अन् प्रशासकीय सेवेत असतानाही कविता त्यांच्यासोबत कायम राहिली. ‘मुंह मे राम बगल में छुरी/ अवैध कारोबारों में भक्ति पूरी/ गुणा-भाग में वह भारी धुरंधर/ पत्थर और ईश्वर में न जाने कोई अंतर।’ असे वास्तव ‘अधिकारी’ या कवितेत (हिंदूी भाषांतर) ते दाखवून देऊ शकले ते त्यामुळेच. ‘गावना देवता’, ‘अनावतार ओ अन्य अन्य’ हे १९७५-७६ सालातले कवितासंग्रह आणि पुढच्याच वर्षांत प्रसिद्ध झालेले ‘घुणाक्षरा’, ‘सताद्रु अनेक’ या संग्रहांनी कवी म्हणून ओडिया साहित्यविश्वात पण्डा यांची ओळख दृढ झाली. पुढील काळात ‘शैलाकल्प’, ‘अन्य’, ‘ईशाखेला’, ‘बहुभिरी’, ‘द्रोहवाक्य’, ‘दुजानारी’ यांसारख्या त्यांच्या कवितासंग्रहांनी ओडिया कवितेला बांधिलकीचे महत्त्व दाखवून दिले.  ‘सत्य के  उस पार तो झूट-मूठ की संभावना है/  झूट को सच में बदलने के लिये ही तो संगत जमी है.. कोई आने को है।’ अशा ओळी पण्डा लिहितात, त्यामागे ओडिया लोकपरंपरेची आणि आधुनिकतेने आलेल्या जागृतीची बौद्धिक जाणीव दिसून येते. साहित्य अकादमी पुरस्कार, गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार यांसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यात आता कुवेम्पु पुरस्काराची भर पडल्याने ओडिया कवितेचाही मान वाढला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 2:26 am

Web Title: odia poet rajendra kishore panda chosen for 2020 kuvempu award zws 70
Next Stories
1 के. व्ही. संपतकुमार
2 डॉ. एस. कामेश्वरन
3 डॉ. कुमार ईश्वरन
Just Now!
X