21 February 2019

News Flash

पं. डी. के. दातार

भारतीय अभिजात संगीतात वाद्यवादनाची एक फार मोठी परंपरा आहे.

भारतीय अभिजात संगीतात वाद्यवादनाची एक फार मोठी परंपरा आहे. अनेक कलावंतांनी त्यामध्ये मिळवलेले प्रावीण्य वाखाणण्याजोगे आहे. पंडित डी. के. दातार हे अशांपैकी एक अतिशय मानाचं नाव. व्हायोलिन या वाद्यावरील त्यांचे प्रभुत्व तर वादातीत होते, परंतु त्यातील त्यांचे कौशल्य आणि त्या वाद्याकडे पाहण्याची त्यांची नजर यामधील फरक भारतीय रसिकांना सहजपणे कळू शकत होता. त्यामुळेच डी. के. दातार यांचे नाव भारतीय संगीतातील शिखर कलावंतांच्या यादीत सहजपणे जाऊन पोहोचले. नाव सहजपणे पोहोचले, तरीही त्यामागे पंडित दातार यांचे प्रचंड कष्ट मात्र रसिक म्हणून लक्षात येत नाहीत. आपल्या वादनात वेगळेपण आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या वाद्यावरील त्यांची पकड लक्षात आणून देतो.

वडील गायक कलावंत असल्याने घरात संगीत जन्मापासूनच सुरू होते. पं. दातार यांनी गायन शिकण्यास सुरुवातही केली; परंतु त्यांच्या मोठय़ा बंधूंनी त्यांच्या हाती व्हायोलिन हे वाद्य सोपवले आणि मग पंडितजी व्हायोलिनमयच होऊन गेले. या वाद्याचे व्यवस्थित प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रा. बी. आर. देवधर यांच्या संगीतशाळेत प्रवेश घेतला आणि तिथे त्यांना पंडित विघ्नेश्वरशास्त्री यांच्यासारख्या मोठय़ा कलावंताकडून तालीम मिळाली. त्यामुळे वाद्याच्या ओळखीचे रूपांतर त्यावरील प्रेमात झाले; पण दातारांना काही वेगळे करायचे होते. त्यामुळे त्यांनी या वाद्यावर भारतीय अभिजात संगीतातील गायन पद्धतीच्या अंगाने काय करता येईल, याचा विचार सुरू केला. पंडित डी. व्ही. पलुस्कर यांच्यासारख्या त्या काळातील अतिशय मोठय़ा कलावंताकडून त्यांना या गायकी अंगाची तालीम मिळाली आणि त्यामुळे त्यांचे वाद्यवादन वेगळ्याच खुमारीने झळाळू लागले. भारतातील सगळ्या संगीत संमेलनांमध्ये त्यांचे स्वतंत्र एकलवादन झाले आणि रसिकांनी त्यांच्या वादनाला भरभरून दाद दिली; पण पंडितजींनी त्याबरोबरच देशातील अनेक मोठय़ा गायक कलावंतांबरोबर मैफलीत व्हायोलिनवर संगत केली. याचे कारण त्यांच्या वादनात गायकी अंगाचे दर्शन होते. अनेक शिष्य घडवणे हे प्रत्येक कलावंताच्या नशिबी असतेच, असे नाही; पण दातारांनी एक मोठी शिष्यपरंपरा निर्माण केली. संगीताचे अध्यापन करण्याचाही त्यांचा ध्यास महत्त्वाचा होता. त्यामुळे देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी व्हायोलिनवादनाचे अध्यापनही केले. शांत आणि संयमी कलावंत म्हणून त्यांची ओळख त्यांच्या स्वभावातच दडलेली होती. त्यांच्या निधनाने भारतीय वाद्यवादनातील एक महत्त्वाचा तारा निखळून पडला आहे.

First Published on October 12, 2018 3:02 am

Web Title: pandit d k datar