गणित व भौतिकशास्त्र यांचे सख्य पूर्वापार आहे. ज्यांना गणित जमते, त्यांना आपसूकच भौतिकशास्त्रात गती असते. अमेरिकेतील ‘मसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)’ या नामवंत विद्यासंस्थेत दीर्घकाळ अध्यापन केलेले इसाडोर एम. सिंगर यांच्या बाबतीत तर हे पूर्ण सत्य! विसाव्या शतकातील विज्ञानावर गडद ठसा उमटवलेल्या या गणितीचे अलीकडेच वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. पाच दशकांहून अधिक काळ गणिताच्या क्षेत्रात काम करताना सिंगर यांनी त्याची सांगड भौतिकशास्त्राशी घालण्याचा प्रयत्न केला. सिंगर यांनी ‘इंडेक्स थिअरी’ हा नवा सिद्धान्त मांडला. त्यांना अमेरिकेचे मानाचे राष्ट्रीय विज्ञान पदक तर मिळाले होतेच; पण ‘गणितातील नोबेल’ मानल्या जाणाऱ्याआबेल पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते.

सिंगर यांचे आई-वडील पोलंडहून स्थलांतरित होऊन अमेरिकेत आलेले. स्थलांतरितांस ज्या आर्थिक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते, त्यास सिंगर कुटुंबीयही अपवाद नव्हते. त्यामुळे अत्यंत हलाखीच्या स्थितीत सिंगर यांचे बालपण गेले. मिशिगन विद्यापीठातून शिष्यवृत्तीवर पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्यासिंगर यांनी काही काळ अमेरिकी लष्करात सेवा बजावली असली, तरी गणित आणि भौतिकशास्त्रात त्यांना सुरुवातीपासूनच रुची होती. शिकागो विद्यापीठातून गणिताचे शिक्षण घेऊन ते १९५० मध्ये एमआयटीत दाखल झाले. तेथे त्यांना आंतरविद्याशाखीय स्वातंत्र्य मिळाले. ते दर आठवड्यात भौतिकशास्त्र व गणितावर चर्चासत्रे घेत असत. तो अनेकांसाठी बौद्धिक मेजवानीचा भाग असे. शिकागो विद्यापीठातील आयव्र्हिंग सीगल या गणितीच्या सूचनेनुसार त्यांनी गणितीय विश्लेषणावर काम सुरू  केले. गणितीय सिद्धान्त भौतिकशास्त्रातील अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले.

सिंगर यांनी रिचर्ड कॅडीसन यांच्यासमवेत ‘कॅडीसन-सिंगर कॉन्जेक्चर’ १९५९ मध्ये मांडले. त्यातून ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक यांना पुंजभौतिकीतील अनेक कोडी उलगडण्यास मदत झाली. उपयोजित (अ‍ॅप्लाइड) गणिताचा वापर सिंगर यांनी नेहमी केला. अभियांत्रिकी तसेच सैद्धान्तिक संगणकीय विज्ञानातील अनेक कोडी त्यामुळे २०१३ पर्यंत सुटली. १९६३ मध्ये मायकेल अतियाह यांच्यासह त्यांनी ‘अतियाह-सिंगर इण्डेक्स थिअरम’ हा सिद्धान्त मांडला. तो गणित, भूमिती व स्थानशास्त्राशी संबंधित होता. डिरॅक यांचे पुंजभौतिकीत इलेक्ट्रॉनबाबतचे जे आकलन होते, त्यास पूरक असे काम या दोहोंनी केले. सिंगर यांनी दीर्घकाळ गणिताचे अध्यापन करून अनेक उत्तम विद्यार्थी घडवले.