मायक्रोसॉफ्ट ही कंपनी स्थापन करण्यात ज्यांचा वाटा होता, ते पॉल अ‍ॅलन हे केवळ तंत्रज्ञ नव्हते तर दानशूर व्यक्तीही होते. समविचारी माणसे एकत्र आल्यानंतर जे घडते त्याचे प्रत्यक्षातील रूप म्हणजे मायक्रोसॉफ्ट. बिल गेट्स यांच्यासह त्यांची जमलेली जोडी त्यांच्या निधनाने कायमची फुटली आहे. संगणक क्षेत्रातील क्रांतीचे ते पाईक होते. सिअ‍ॅटलला त्यांच्या कर्तृत्वातूनच संगणक संस्कृतीचे केंद्र ही ओळख मिळाली. त्यांच्या शांत चिंतनातून जी उत्पादने जन्मली, त्यांनी माहिती तंत्रज्ञानात कायमची छाप पाडली, हे सगळे घडत असतानाच त्यांनी कर्करोगाशी दिलेली चिवट झुंजही तशीच सर्वाना उमेद देणारी आहे. पहिली सात वर्षे अ‍ॅलेन हेच मायक्रोसॉफ्टची प्रेरक शक्ती होते. व्यक्तिगत संगणक केवळ कुतूहलाची पायरी ओलांडून तंत्रज्ञानाचे प्रतीक बनत असताना बिल गेट्स व अ‍ॅलन यांनी त्याला वेगळे परिमाण दिले. मायक्रोसॉफ्ट कंपनी १९७५ मध्ये स्थापन झाली. लहान संगणकांना सॉफ्टवेअर तयार करून देणारी  कंपनी म्हणून त्यांनी या कंपनीचे नामकरण मायक्रोसॉफ्ट केले. आयबीएमसाठी त्यांनी सॉफ्टवेअर तयार करून दिले. त्यातून पुढे एमएस डॉसचा जन्म झाला. मायक्रोसॉप्टची ऑपरेटिंग सिस्टीमही नंतर लोकप्रिय ठरली. या सगळ्या उत्पादनांचे श्रेय अ‍ॅलन यांना होते. बिल गेट्स व अ‍ॅलन एकाच शाळेतले. अ‍ॅलनना वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळूनही त्यांनी हनीवेलमधून प्रोग्रॅमरचे काम सुरू केले. त्या वेळी गेट्स हार्वर्ड विद्यापीठात शिकत होते. नंतर अ‍ॅलन यांनीच गेट्स यांना हार्वर्डबाहेर पडण्यास प्रवृत्त केले. अल्बुकर्क येथे दोघांनी पहिला व्यक्तिगत संगणक तयार केला. स्टार्टअप हा शब्दही नव्हता तेव्हा ते हे साहस करीत होते. अ‍ॅलन यांच्या आठवणी ‘आयडिया मॅन’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाल्या. त्यात त्यांनी या साहसी प्रवासाचा आढावा घेतला आहे. दानशूरता हा त्यांचा दुसरा गुण. त्यांनी २ अब्ज डॉलर्स ‘ना नफा संस्थां’ना दिले होते. वैज्ञानिक संशोधन संस्थांना त्यांची मदत फार मोलाची ठरली. अ‍ॅलन इन्स्टिटय़ूट फॉर ब्रेन सायन्स व अ‍ॅलन इन्स्टिटय़ूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संस्था त्यांनी स्थापन  केल्या. सिअ‍ॅटलमध्ये जन्मलेल्या अ‍ॅलन यांनी शहरात सांस्कृतिक संस्थांना भरपूर मदत केली. विज्ञान चित्रपटांसाठी खास थिएटर उभारले. संगीतावरील प्रेमापायी एक्सपिरियन्स म्युझिक प्रोजेक्ट सुरू केला. स्थानिक बास्केटबॉल, फुटबॉल संघांनाही मदतीचा हात दिला, ते कल्पक तंत्रज्ञ होते व त्यांची दानशूरताही विज्ञान व क्रीडा क्षेत्राला  संजीवनी देणारी होती. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने अनेकांचा आधारस्तंभच गेला आहे.