12 August 2020

News Flash

बलबीर सिंग कुल्लर

शालेय कारकीर्दीतच बलबीर यांच्या हॉकी वाटचालीला प्रारंभ झाला.

हॉकीमध्ये एके काळी भारताचे निर्विवाद वर्चस्व होते. या सुवर्णकाळात भारताने आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत. हॉकीच्या यशात पंजाब राज्याच सिंहाचा वाटा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या राज्याच्या जालंधर जिल्ह्यातील संसारपूर गावाने भारताच्या २७ पदकांमध्ये योगदान दिले आहे आणि १४ ऑलिम्पिक हॉकीपटू घडवले आहेत. या बलबीर सिंग कुल्लर यांच्या रविवारी झालेल्या निधनामुळे संसारपूरचा एक यशस्वी शिलेदार हरपला आहे.

शालेय कारकीर्दीतच बलबीर यांच्या हॉकी वाटचालीला प्रारंभ झाला. वयाने १८ वर्षांचे होण्यापूर्वी, १९५७ ते १९६० या कालखंडात अखिल भारतीय शालेय क्रीडा स्पर्धेत त्यांनी कर्णधारपदही भूषवले. विद्यापीठ स्तरावरही त्यांनी आपल्या खेळाने मैदान गाजवले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी पंजाब, भारतीय रेल्वे आणि पंजाब पोलिसांचे प्रतिनिधित्व केले. मोहन बगान या संघाकडूनही ते हॉकी खेळले. १९६२ मध्ये ते पंजाब सशस्त्र पोलीस दलात रुजू झाले, १९६३मध्ये त्यांना पंजाब पोलिसांनी साहायक पोलीस उपनिरीक्षक ही जबाबदारी सोपवली. हे वर्ष बलबीर यांच्या कारकीर्दीला कलाटणी देणारे ठरले. कारण याच वर्षी त्यांना ऑलिम्पिकपूर्व सामन्यांत लिआँ (फ्रान्स) येथे भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना आघाडीपटू म्हणून आपला दर्जा निर्माण केला. मग बेल्जियम, इंग्लंड, नेदरलँड्स, न्यूझीलंड आणि पश्चिम जर्मनी या देशांच्या दौऱ्यांवरही बलबीर यांनी भारताकडून दिमाखदार कामगिरी केली. मग १९६६मध्ये बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात बलबीर यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतर १९६८ मध्ये मेक्सिको ऑलिम्पिकच्या, हॉकीतील कांस्यपदक विजेत्या भारतीय संघातही बलबीर यांचा समावेश होता. मेक्सिको देशाची राजधानी मेक्सिको सिटी येथे झालेल्या या १९ व्या ऑलिम्पिकमध्ये संसारपूर गावच्या सात हॉकीपटूंनी सहभाग घेऊन इतिहास घडवला. यापैकी पाच हॉकीपटूंनी भारताचे आणि दोन जणांनी केनियाचे प्रतिनिधित्व केले. १९६८ ते १९७५ या कालखंडात त्यांनी अखिल भारतीय पोलीस संघाचे प्रतिनिधित्व केले, तसेच काही काळ नेतृत्वही सांभाळले. १९८१मध्ये पोलीस उपाधीक्षक या पदावर त्यांना बढती मिळाली, तर १९८७मध्ये भारतीय पोलीस सेवेतील अधिकारीपद त्यांना प्राप्त झाले. फेब्रुवारी २००१मध्ये ते पोलीस दलातून निवृत्त झाले, तेव्हा उपमहानिरीक्षक हे पद त्यांच्याकडे होते. क्रीडा क्षेत्रातील बलबीर यांच्या कारकीर्दीबद्दल १९९९मध्ये क्रीडा खात्याने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले, तर २००९मध्ये केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९४२ मध्ये जन्मलेले बलबीर सिंग कुल्लर ७८ वर्षांचे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 12:02 am

Web Title: profile balbir singh kullar akp 94
Next Stories
1 लॉरेन्स टेस्लर
2 न्या. एस. मुरलीधर
3 कॅथरीन जॉन्सन
Just Now!
X