अफगाणिस्तानातील लष्कर तेथील तालिबानी अतिरेक्यांशी कसे लढते आहे, याची छायाचित्रे काढण्याची दानिश सिद्दीकीला मिळालेली संधी ही त्याच्या ३८ वर्षांच्या आयुष्यातील शेवटची ठरली. गेल्या आठवड्यात कंदाहारनजीकच्या चकमकीत तो मारला गेला आणि मायदेशी परतला तो त्याचा पार्थिव देह. अंत्यविधी सोमवारी १९ जुलैच्या पहाटे झाला, पण त्याहीनंतर समाजमाध्यमांमध्ये त्याच्या धर्माचा उद्धार करणाऱ्या, त्याला शिव्या घालणाऱ्या आणि ‘बरे झाले’ यासारखी हीन प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या नोंदी उरतीलच. त्या नोंदींहूनही अधिक काळ टिकून राहणारे, अजरामर असे त्याचे काम. कॅमेऱ्यातून ‘नरेचि केला हीन किती नर’ ही अवस्था बरोब्बर टिपणारे! मरणोत्तर शिव्या ज्यांनी घातल्या, त्यांचा भाईबंद शोभणारा कपिल गुज्जर शाहीनबागेत पोलिसांच्या देखत बंदूक चालवत असतानाचा क्षण दानिश सिद्दीकीने टिपला होता, कपड्यांवरून मुस्लीम दिसणाऱ्या एकाला जमाव मारहाण करत असल्याचे किंवा कुठल्याशा हिंदू संघटनेचे सदस्य म्हणवणारे लोक ग्रेटा थनबर्ग हिची प्रतिमा जाळत असल्याचे दृश्यही त्याने टिपले होते. अतिरेक- मग तो इस्लाम धर्मीयांचा असो की अन्य कुठल्या- त्याने अनेकदा टिपला! त्यासाठी त्याला संधी मिळत गेली ती शांतिफौजांच्या सोबत जाणारा छायाचित्रकार म्हणून. इराकमधले मोसुल शहर आणि अफगाणिस्तान या त्यापैकी मोठ्या संधी. श्रीलंकेतील चर्चमध्ये इस्लामी अतिरेक्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये टिपण्यासाठी तो एकटाच गेला, तेव्हा एका कॉन्व्हेन्ट शाळेत परवानगीविना घुसला म्हणून अटकही झाली- पण अशाही प्रसंगांत, तो ज्यांच्यासाठी काम करी त्या ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेचा पाठिंबा त्याला मिळाला. रोंहिग्या निर्वासितांचे हाल टिपल्याबद्दल याच संस्थेच्या ज्या पथकास ‘पुलित्झर पारितोषिक’ मिळाले, त्यातही त्याचा वाटा होता. अलीकडे देशातील करोना-कांडाची छायाचित्रे त्याने टिपली, त्यापैकी ‘एकमेकांलगत पेटवलेल्या अनेकानेक चिता’ हे ड्रोनमधून टिपलेले छायाचित्र गाजले.

दानिश सिद्दीकी मूळचा दिल्लीचा. तिथेच शालेय शिक्षण घेऊन ‘जामिया मिलिया’ या शिक्षणतज्ज्ञ अबुल कलाम आझादांचा वारसा सांगणाऱ्या विद्यापीठात तो बीए (अर्थशास्त्र) व पत्रकारिता शिकला. इंग्रजी वृत्तपत्र, वृत्तवाहिनी असे टप्पे घेत २०१० साली ‘रॉयटर्स’मध्ये आला आणि याच संस्थेचा ‘भारतातील प्रमुख छायाचित्रकार’ हे पदही त्याला मिळाल्यानंतर, तो व्यवसायाने मुंबईकर झाला. देशात किंवा परदेशात कामानिमित्त जाऊन परतल्यावर एखादे छायाचित्र मुंबईच्या समुद्राचे काढणे हा त्याचा विरंगुळा. अफगाण मोहिमेनंतर मात्र मुंबईचा किनारा तो पाहू शकला नाही.