News Flash

डॉ. काजल चक्रबर्ती

चक्रबर्ती यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पोषण व औषध या दोन्ही दिशांनी काम केले आहे.

आपला आहारविहार आपल्या जीवनाची गाडी रुळावर ठेवत असतो; पण वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवणे ही  सोपी गोष्ट नाही. त्यावर आपण कृषी-तंत्रज्ञानाने मात केली असली तरी त्यामुळेच कीटकनाशकांचा वापर वाढून कर्करोगात वाढ झाली, आपण जे अन्न खातो त्याला कसदारपणा राहिला नाही, अशा आव्हानात्मक परिस्थितीत अन्न संशोधनासाठी काम करणाऱ्यांपैकी एक म्हणजे केंद्रीय सागरी मच्छीमारी संशोधन संस्थेतील मुख्य वैज्ञानिक डॉ. काजल चक्रबर्ती! त्यांना भारतीय अन्न संशोधन परिषदेचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार नुकताच जाहीर झाला. सागरी शैवालापासून त्यांनी विविध जीवनशैलीजन्य रोगांवर उपचार ठरू शकतील अशा औषधी पोषक उत्पादनांची निर्मिती केली. पाच वर्षांतून एकदा दिला जाणारा हा पुरस्कार १० लाख रुपयांचा आहे. या शिवाय हा पुरस्कार मिळालेल्या वैज्ञानिकास पुढील पाच वर्षांच्या संशोधनासाठी १.५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येते त्यावरून या पुरस्काराचे महत्त्व लक्षात येते.

चक्रबर्ती यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पोषण व औषध या दोन्ही दिशांनी काम केले आहे. त्याला औषधी पोषक उत्पादने असे म्हणता येईल ती त्यांनी सागरी शैवालापासून तयार केली. हृदयाचा संधिवात, टाइप २ मधुमेह, डिस्लिपिडिमिया (जास्त कोलेस्टेरॉल), अतिरक्तदाब, हायपरथायरॉडिझम यावर त्यांनी पोषकांचे उपाय शोधले आहेत. हाडांचा ठिसूळपणा हा अलीकडे वाढत चाललेला रोग -कारण आपल्याला अन्नातून पुरेशी पोषके मिळत नाहीत- यावर त्यांनी काम केले आहे. अँटीऑस्टिपोरोटिक द्रव्ये त्यांनी शोधली आहेत. सध्या करोनाची साथ चालू आहे त्या अनुषंगाने प्रतिकारशक्ती वाढवणारी नैसर्गिक द्रव्येही त्यांनी मिळवली आहेत. जिवाणूजन्य आजारांवरही त्यांनी काम केले असून हेटेरॉफिक जिवाणूचा वापर त्यांनी अनेक औषधांना दाद न देणाऱ्या रोगजंतूंवरही केला आहे.

त्यांचे कृषी पदवीपर्यंतचे शिक्षण बंगालमध्ये झाले असले तरी पदव्युत्तर शिक्षण व पीएच.डी.चे काम दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेतून झाले आहे. सागरातील पदार्थांचा वापर अन्न रसायनशास्त्रासाठी करून त्यातून नवीन उत्पादने तयार करण्यात त्यांनी मोठे यश मिळवले आहे. कॅडलमिन हा त्यांनी हरितशैवालापासून तयार केलेला अर्क अनेक रोगांवर गुणकारी ठरला आहे. त्यामुळे कृत्रिम औषधांना नैसर्गिक औषधांचा पर्याय आपल्या सभोवताली असलेल्या साधनातून शोधण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध असून त्यांना सी. व्ही. कुलकर्णी तरुण वैज्ञानिक पुरस्कार, टी. जे. पांडियन पुरस्कार, ए. जे. मॅटी पुरस्कार, प्राण व्होरा पुरस्कार असे अनेक पुरस्कार यापूर्वी मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:10 am

Web Title: profile dr kajal chakraborty akp 94
Next Stories
1 दानिश सिद्दीकी
2 सुरेखा सिक्री
3 यशपाल  शर्मा
Just Now!
X