अवघ्या आठ महिन्यांच्या काळात दोघा भारतीय अणुवैज्ञानिकांचा करोनाने बळी घेतला. त्यातील एक म्हणजे सेखर बसू व आता श्रीकुमार बॅनर्जी. बॅनर्जी हे अणुवैज्ञानिक म्हणून परिचित असले तरी त्यांचा मोठा गुण हा संस्थात्मक उभारणीचा होता. भारत-अमेरिका यांच्यात अणुकरार झाला त्यावेळी बॅनर्जी यांनी ‘सिव्हिल लायाबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज बिल’ या विधेयकाच्या निर्मितीतही मोठे काम केले होते. बॅनर्जी हे आण्विक प्रक्रियेतील जागतिक तज्ज्ञ होते. खरगपूरच्या आयआयटीतून ‘बी.टेक.’ पदवी घेऊन ते भाभा अणुऊर्जा संशोधन  केंद्रात १९६८ मध्ये दाखल झाले. १९७४ मध्ये त्यांना या संस्थेतील कामासाठी पीएच.डी. देण्यात आली. २००४ ते २०१० या काळात भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे संचालकपद त्यांनी भूषवले. आण्विक प्रक्रियांत धातू संमिश्रांचा वापर करण्यात त्यांची तज्ज्ञता मोठी होती. अमेरिका-भारत आण्विक करारावर  (‘१२३’ करार) स्वाक्षरी केल्यास भारत आण्विक स्वायत्तता गमावून बसेल ही भीती निरर्थक असल्याचे राज्यकर्त्यांना पटवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. भारत कुठलेही सामरिक पर्याय या कराराने गमावणार नाही हे पटवून देताना आण्विक व्यापारातील उणिवांतून त्यांनी देशाला बाहेर काढले. अन्यथा भारताला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आज जे स्थान आहे ते राहिले नसते. एका अर्थाने भारतीय अणुशक्ती क्षेत्राचा भविष्यकाळ त्यांनी उज्ज्वल केला. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. अलीकडच्या आभासी बैठकांतही ते सहभागी झाले. अनेक संस्थांशी त्यांचा शैक्षणिक संबंध होता. भाभा अणुसंशोधन केंद्रात त्यांनी बरेच संशोधन केले; त्यात आण्विक इंधनाच्या अनुषंगाने काही अभिनव अणुभट्ट्यांची रचना केली. प्रारणे व किरणोत्सारी समस्थानिकांचा शेतीतील वापर यावरही भर दिला. भारतीय अणुऊर्जा आयोगाची सूत्रे अनिल काकोडकर यांच्याकडून स्वीकारल्यानंतर त्यांनी भारताच्या आण्विक धोरणाला दिशा दिली. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष व अणुऊर्जा सचिव म्हणून ते २०१२ मध्ये निवृत्त झाले. इंडियन न्यूक्लिअर सोसायटी अ‍ॅवॉर्ड, नॅशनल मेटॅलर्जिस्ट अ‍ॅवॉर्ड, अमेरिकन न्यूक्लिअर  सोसायटीचे अध्यक्षीय मानपत्र हे पुरस्कार तर त्यांना मिळालेच, पण  १९८९ मध्ये त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आणि २००५ मध्ये त्यांना पद्माश्री किताब देण्यात आला. सोप्या भाषेत माहिती समजावून सांगण्याचा त्यांचा हातखंडा विद्यार्थ्यांसमवेत काम करताना जसा कामी आला तसा विविध बैठकांमध्ये भूमिका पटवून देतानाही आला. मराठीप्रेमी उच्चपदस्थ, असाही त्यांचा लौकिक होता. त्यांच्या निधनाने, कर्तृत्वाने मोठ्या अशा अणुवैज्ञानिकास आपण मुकलो आहोत.