‘बर्फ व सेंद्रिय रसायनांचा गोळा असलेल्या धूमकेतूंवर अफाट उंचीची जनुकसंस्कारित झाडे गुरुत्वाकर्षणाचा अडथळा दूर करून वाढू शकतात, त्यांच्या मदतीने लाखोपट अधिक ऑक्सिजन मिळवता येईल, त्यातून मानवतेला मोठी संजीवनी मिळेल,’ अशी एक संकल्पना ‘डायसन ट्री’ नावाने प्रसिद्ध आहे. ही वेगळी संकल्पना मांडणारे गणितज्ञ व सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे फ्रीमन डायसन. त्यांचे अलीकडेच निधन झाले. अणुसिद्धांतातील अनेक कोडी त्यांनी गणितातून सोडवली होती. गहन आणि अवघड विषय ते लोकांना अगदी सोपे करून सांगताना काही वेळा ते संकल्पना इतक्या ताणत की, ते वेडपट आहेत असा भास होई. या नादिष्टपणामुळेच ते इतके संशोधन करू शकले. ते जन्माने ब्रिटिश, बर्कशायरला जन्मले आणि अवघड गणिते सोडवत वाढले; पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते न्यू यॉर्कला कॉर्नेल विद्यापीठात गेले. तेथे भौतिकशास्त्रात संशोधन करताना, अणू किंवा इलेक्ट्रॉन हे जेव्हा प्रकाश शोषून घेतात तेव्हा त्यांच्या वर्तनात काय फरक पडतो यावर एकही अचूक सिद्धांत नव्हता तो शोधून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पुढे न्यू जर्सीत प्रिन्स्टन येथे इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी या संस्थेत बराच काळ मानद प्राध्यापक म्हणून काम केले. व्हिएतनाम युद्धावेळी अण्वस्त्र वापराबाबत लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते. मात्र अण्वस्त्रांचे धोके माहीत असल्याने, त्यांनी कधीही चुकीचे सल्ले दिले नाहीत. पुढे ओबामाकाळात, इराण-अमेरिका अणुकराराचे त्यांनी स्वागतच केले होते.

डायनस ट्रीप्रमाणेच त्यांची ‘डायसन स्फिअर’ ही संकल्पना स्टार  ट्रेक  मालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. बसप्रवासात त्यांना पुंज विद्युत गतिकीवरील अनेक कूटप्रश्नांचे उत्तर सापडले होते, जो कूटप्रश्न रिचर्ड फेनमन व हॅन्स बीथे यांच्यासारख्या दिग्गज वैज्ञानिकांनाही सुटला नव्हता. फेनमन व श्वाइनगर यांना जेव्हा नोबेल मिळाले त्या वेळी डायसन यांचाही विचार होणे आवश्यक होते; पण त्याची खंत त्यांना नव्हती. ‘डिस्टर्बिग द युनिव्हर्स’ या आठवणीपर पुस्तकात त्यांनी असे म्हटले होते की, माझे गणितावर प्रेम होते. बाकी कशात रस नव्हता. ‘इनफिनाइट इन ऑल डायरेक्शन’, ‘इमॅजिन्ड वल्र्ड्स’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. तरुण गणितज्ञांनी सिद्धांत मांडावे, वयस्कर गणितज्ञांनी पुस्तके लिहावी, हा गणितज्ञ हार्डी यांचा मूलमंत्र त्यांनी पाळला. २०१२ मध्ये त्यांनी ‘गेम थिअरीचा डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतात वापर’ असा शोधनिबंध लिहून जीवशास्त्राच्या प्रांतातही मुशाफिरी केली होती.