कर्नाटक विधानपरिषदेचे दोनदा सदस्यपद आणि पुढली सुमारे सहा वर्षे ‘कन्नड विकास प्राधिकरणा’चे अध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळवलेले प्रा. डॉ. सिद्धलिंगय्या आणि भारतीय स्वातंत्र्याची ४० वर्षे साजरी होत असताना ‘यारिगे बंतु यल्लिगे बंतु नालवत्तूरा स्वातंत्र्या’ (कुणा मिळाले, कुठे मिळाले, चाळिशीतले स्वातंत्र्य?) किंवा अशी गावोगावच्या चळवळींना आपलीच वाटणारी विद्रोही गाणी लिहिणारे सिद्धलिंगय्या एकच! विद्रोह, विनोदबुद्धी आणि शिष्टसंमतता यांचे अचाट मिश्रण या कन्नड कवीमध्ये होते. आठ कवितासंग्रहांसह तीन नाटके, आत्मचरित्राचे तीन खंड, समीक्षालेखांची पाच पुस्तके अशी लेखनसंपदा मागे सोडून, १२ जून रोजी त्यांचे निधन झाले.

दलित साहित्याची ‘निळी पहाट’ महाराष्ट्रात झाल्यानंतर, १९७५ मध्ये हा प्रवाह कर्नाटकातही पोहोचत असतानाच्या पहिल्या काही दलित कवींपैकी सिद्धलिंगय्या हे एक. त्याआधी १९७४ मध्ये पँथरइतकी लढाऊ नव्हे, पण दलितांचे प्रश्न मांडणारी ‘दलित संघर्ष समिती’ ही संघटना त्यांनी समविचारी प्राध्यापक-साहित्यिकांच्या साथीने सुरू केली. दलितांहाती राज्य देण्याची हाक देणाऱ्या ‘दलितर बरुवरु माडिबिडी, दलितर कइगे राज्य कुडी’ यासारख्या त्यांच्या कविता निव्वळ अत्याचारांचे वर्णन करण्यावर न थांबता पुढे जाणाऱ्या, समाजाला संघर्षप्रवण करणाऱ्या होत्या. नंतरच्या काळात मात्र या विद्रोहाची धग कमी झालेली दिसते, असे मत सिद्धलिंगय्या ज्यांना फार मानत, असे कन्नड समीक्षक डी. आर. नागराज यांनी नोंदवले आहे. मात्र या काळात त्यांनी दिलेल्या साहित्यिक मुलाखतींमधून या बदलामागचे कंगोरे उलगडतात. दलित जीवनानुभव हा कष्टाचा आणि अवहेलनेचा असतो, पण या जिण्याला हसून साजरे करत पुढे जाण्याची ताकदही दलितांमध्ये असते, असा त्यांचा विश्वास होता.  दलितांची विनोदबुद्धी अधिक विदग्ध असते, याची अनेक उदाहरणे ते देत. ही वृत्ती, १९९७ सालच्या त्यांच्या ‘ओरु केरी’ या आत्मचरित्रात उमटली आहे. आत्मचरित्राचा दुसरा व तिसरा भागही त्यांनी लिहिला. २०१८ मध्ये आलेल्या तिसऱ्या भागात ‘दलित अनुभवां’चा लवलेशही नाही, असेच समीक्षकांचे मत होते.

पण माक्र्सवादापासून उपनिषदांपर्यंत कशावरही, कुणाशीही (कन्नड भाषेत) चर्चेस तयार असणारे सिद्धलिंगय्या याच काळात, जगही कसे बदलते आहे हे अचूकपणे टिपत राहिले होते. साधारण २०१५ मध्ये त्यांची नियुक्ती केंद्र सरकारतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंती साजरी करण्याच्या समितीवर झाली, तेव्हा ती स्वीकारल्याबद्दल त्यांच्यावर भरपूर टीका झाली. पण ‘‘ही नियुक्ती स्वीकारल्यामुळेच तर, अमित शहांना मी ‘खासगी क्षेत्रात आरक्षण ठेवा’ अशी सूचना करू शकलो’’ असे ते म्हणत! दुसरीकडे, दलितांच्या संघटनांनी केवळ दलितांपुरते पाहिले तर त्या ‘दलितांचा रा. स्व. संघ’ ठरतील, अशी बोचरी टीकाही त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत केली होती.

‘वसतिगृहात सफाई कामगार म्हणून काम करणारीचा मुलगा’ ही स्वत:ची ओळख ते अनेकदा सांगत, पण यू. आर. अनंतमूर्तींपासून रा. स्व. संघाच्या एच. व्ही. शेषाद्रीपर्यंतच्या अनेकांशी स्नेहही जोडत. करोनामुळे ६७ व्या वर्षीच झालेल्या त्यांच्या निधनाने, त्यांच्या व्यक्तित्वातील हे वाङ्मयपूरक विरोधाभासदेखील निमाले आहेत.