क्रिकेटपटू म्हणून मायकेल होल्डिंग १९८७ मध्येच निवृत्त झाले. पण त्या वेळी चाहत्यांना वाटली होती, त्यापेक्षा अधिक हुरहुर त्यांच्या अलीकडच्या घोषणेविषयी व्यक्त होताना दिसते. ती घोषणा आहे त्यांच्या ‘दुसऱ्या’ निवृत्तीची. कदाचित हा समाजमाध्यमांचा परिणाम असू शकेल. एक समालोचक म्हणून होल्डिंग यांचा ‘कॅरेबियन’ आवाज यापुढे ऐकू येणार नाही किंवा त्यांचे अत्यंत परखड आणि काही वेळा गैरसोयीचे ठरू शकेल असे सादरीकरणही यापुढे दिसणार नाही. मायकेल होल्डिंग यांना त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात ब्रिटिश पंचांकडून ‘व्हिस्र्पंरग डेथ’ अशी उपाधी मिळाली होती. अत्यंत दूरवरून लांबच लांब ढांगा टाकत ते गोलंदाजीसाठी धावत जायचे. परंतु शारीर हालचालींवर विलक्षण पकड आणि एकाग्रता, त्यामुळे पंचांजवळ आल्यावर मैदानातील गवतावर केवळ ‘सप सप’ असा त्यांच्या पायांचा आवाज कानावर पडायचा. मग शरीराला एक लकबदार हिसका आणि चेंडू विलक्षण वेगाने फलंदाजाचा वेध घेत जायचा. म्हणून व्हिस्परिंग डेथ! हेच होल्डिंग जेव्हा समालोचक म्हणून मैदानाबाहेरील कक्षात बसू लागले, त्या वेळी एखाद्या विषयाचा तीक्ष्ण बुद्धी आणि तिखट वाणीने वेध घेणे मात्र सुरूच राहिले.

विविध विषयांवरील त्यांची मते बहुतांना झेपणारी नाहीत. उदा. प्रशिक्षकांचा आणि व्यायाम मार्गदर्शकांचा ताफा बाळगूनही जायबंदी होणाऱ्या गोलंदाजांविषयी ते फार पूर्वीच म्हणाले होते, ‘जलदगती गोलंदाजाने धावत राहिले पाहिजे. ते कमी होईल त्या दिवशी गोलंदाज संपलाच. बाकीच्या उपायांनी त्याचे पुनरुज्जीवन होत नाही.’ टी-२० क्रिकेट हा प्रकार त्यांना कधीही मानवला नाही. आयपीएलविषयी त्यांची मते अत्यंत प्रतिकूल आहेत, पण याचे मूळ टी-२०विषयी त्यांच्या धारणेमध्ये आहे. ‘हे क्रिकेटच नाही,’ असे त्यांचे ठाम मत. ज्या वेस्ट इंडिजच्या दिग्विजयी संघाकडून ते खेळले, त्याची गेल्या काही वर्षांत कसोटी आणि एकदिवसीय या प्रकारांत अधोगती झाली आहे. पण वेस्ट इंडिजचे अनेक क्रिकेटपटू आज जगभर विविध टी-२० स्पर्धांमध्ये भाडोत्री सैनिकांसारखे खेळत असतात. त्यामुळे या प्रकारात ते निष्णात बनले असले आणि दोन वेळचे जगज्जेते बनले असले, तरी होल्डिंग यांचे मत बदललेले नाही.

पण याहीपेक्षा होल्डिंग यांनी गतवर्षी ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’च्या निमित्ताने जाहीर कार्यक्रमात भावनाविवश होऊनही काहीएक भूमिका घेतली, त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदरभाव जगभर दुणावला.

‘स्काय स्पोर्ट्स’च्या त्या कार्यक्रमात निव्वळ अश्रू ढाळून ते स्वस्थ बसले नाहीत. तर काळ्या क्रीडापटूंना भोगाव्या लागलेल्या वर्णद्वेषरूपी अवहेलनांचे दस्तावेजीकरण करून ‘व्हाय वुई नील, हाउ वुई राइज’ हे अप्रतिम पुस्तक लिहिते झाले. मोहम्मद अली यांच्यानंतर गौरेतर खेळाडूंच्या संतापाला अशा प्रकारे वाट मोकळी करून देण्याचे काम होल्डिंग यांच्याइतके इतर कोणी केले नसेल. ‘स्काय स्पोर्ट्स’साठी जवळपास दोन दशके समालोचन करून ते या हंगामाच्या अखेरीस निवृत्त होत आहेत.

भेदक गोलंदाजीइतकेच टोकदार विचार मांडणारा त्यांचा खर्जातला आवाज यापुढे ऐकू येणार नाही, हे रितेपण भरून न निघणारेच!