‘रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ म्हणजेच ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेतील खरोखरचे चढउतार पाहिलेल्या आणि १९८०च्या दशकात या यंत्रणेचे पुनरुज्जीवन करणाऱ्या के. शंकरन नायर यांना येत्या २० डिसेंबरचा ९६ वा वाढदिवस पाहता आला नाही. त्याआधीच, १७ नोव्हेंबर रोजी बंगळुरूच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ‘रॉ’चे हे माजी प्रमुख गेली जवळपास दोन वर्षे वार्धक्याने काहीसे खचले होते व रोजचे वर्तमानपत्रही पाहत नसत; पण त्याआधी त्यांनी जे पाहिले, ते क्वचितच कोणा भारतीयाला पाहायला मिळाले असेल..
पंडित नेहरूंचे मवाळ परराष्ट्र धोरण आणि त्यामुळे चीनबाबत झालेल्या घोडचुका, इंदिरा गांधी यांची बांगलादेश मुक्तिसंग्रामाला पाठिंबा देण्यातली धडाडी आणि आपल्या सत्तास्थानाच्या जवळपास कुणासही फिरकू न देण्याचे राजकारण, त्याच राजकारणामुळे यशवंतराव चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्याची झालेली घालमेल, संजय गांधी यांचा उदयास्त, जे जे इंदिरा गांधींच्या काळात झाले ते ते सारे पुसून टाकण्याचा मोरारजी देसाईंचा अट्टहास.. या साऱ्याचे शंकरन नायर हे जवळचे साक्षीदार होते. ‘रॉ’चे संस्थापक रामेश्वरनाथ काव यांचे सहायक म्हणून १९६८ साली नेमणूक होण्यापूर्वी नायर हे ‘आयबी’ (इंटलिजन्स ब्यूरो)मध्ये अधिकारी होते. काव यांना ‘रॉ’चे प्रमुखपद सोडायला भाग पाडून मोरारजींनी नायर यांना आणले आणि पहिली जबाबदारी दिली ती ‘रॉ’मधील मनुष्यबळ एकतृतीयांशावर आणण्याची! ‘चकमांच्या लढय़ाला कशाला हवा पाठिंबा?’ असेही मोरारजी म्हणत होते, पण नायर यांनी त्यांना याचे महत्त्व पटवून दिले.
अशा अनेक आठवणी, ‘इनसाइड आयबी अ‍ॅण्ड रॉ : द रोलिंग स्टोन दॅट गॅदर्ड मॉस’ या पुस्तकात नायर यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या लिखाणातील काही भागाचे खंडन खुद्द काव यांच्या लिखाणातून होते; पण अशा लेखकीय आगळिकींपेक्षा, गुप्तचर म्हणून त्यांनी जे केले ते अर्थातच महत्त्वाचे ठरते. बांगलादेशात १९७१ मध्ये ‘काव यांचे विश्वासू’ म्हणून नायर यांनी कामगिरी बजावली होती. त्या काळात नेपाळशी चांगले संबंध राखण्यात त्यांचा ‘आतून’ हातभार होता. इंदिरा गांधी यांनी पुन्हा सत्ताग्रहण केले, त्यानंतर ‘रॉ’चे बळ पूर्ववत करण्याची जबाबदारी नायर यांनी सांभाळली; पण बाहेरून.. कारण, १९७९ सालीच त्यांनी साठी गाठली होती. तरीही, ‘नवव्या आशियाई खेळां’चे सचिवपद त्यांना देऊन आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांची नजर राहील, अशी तरतूद इंदिरा गांधींनी केली आणि राजीव गांधींनीही तो वारसा चालविला.