मालवणी नाटकाचा डंका सर्वदूर पोहोचविणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकाचा ४० वा वर्धापन दिन परवाच्या १५ फेब्रुवारीस होता. नेमक्या त्याच दिवशी या नाटकाच्या व्यावसायिक रंगभूमीवरील पहिल्या प्रयोगातील तात्या सरपंच राजा मयेकर हे कालवश व्हावेत, हा नियतीचा दुर्दैवी योग होय. गिरणी कामगार नाटय़ स्पर्धेत गाजलेले ‘वस्त्रहरण’ प्रथम व्यावसायिक रंगभूमीवर येताना त्याचे पहिले वाचन राजा मयेकर यांच्याच कलाकार फोटो स्टुडिओत झाले होते. या नाटकाचे हजारो प्रयोग होतील याची मयेकरांना खात्री होती; परंतु ते करण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही. याचे कारण त्या पदार्पणातील प्रयोगात ‘वस्त्रहरण’मधील दशावतारी नाटकातले नाटक वेगळे करण्याची युगत तेव्हा सापडली नव्हती. ती पुढे सापडली आणि ते धो-धो चालले. तत्पूर्वी राजा मयेकर ‘दशावतारी राजा’ नाटकातून काम करत. शाहीर साबळे यांच्या ‘शाहीर साबळे आणि पार्टी’च्या संस्थापक कलाकारांमध्ये राजा मयेकर हे अग्रणी होते.

शाहीर साबळे, राजा मयेकर आणि सुहास भालेकर या भन्नाट त्रिकुटाने तोवर ग्रामीण मानले जाणारे लोकनाटय़ नागर जनमानसात रुजविण्याचे मोठेच काम केले. ‘यमराज्यात एक रात्र’, ‘आंधळं दळतंय’, ‘असुनि खास मालक घरचा’, ‘रूपनगरची मोहना’, ‘बापाचा बाप’ यांसारख्या लोकनाटय़ांतून समाजप्रबोधनाबरोबरच मुंबईतील मराठी माणसावरील अन्यायाला शाहीर साबळेंनी वाचा फोडली. शिवसेनेच्या प्रसववेणांचा प्रथम उद्गार शाहिरांच्या लोकनाटय़ांतून झाल्याचे म्हटले जाते. त्याचे बिनीचे शिलेदार म्हणून शाहीर साबळे, राजा मयेकर व सुहास भालेकरांकडे पाहिले जाते. गिरणगावातील कामगार रंगभूमीवरील हौशी नाटके, लोकनाटय़े, व्यावसायिक नाटके, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, मालिका अशी चौफेर मुशाफिरी मयेकरांनी ६० वर्षांच्या आपल्या कलाकीर्दीत केली. मच्छिंद्र कांबळी यांच्याआधी नाटक-सिनेमातील मालवणी पात्र म्हटले की सहसा मयेकरांचेच नाव डोळ्यांसमोर येई. किरकोळ देहयष्टी, बेतास बात उंची लाभलेल्या मयेकरांमध्ये चतुरस्र हजरजबाबीपणा, लवचीक देहबोली आणि संवादफेकीचे अचूक टायमिंग ही लोककलावंतांची वैशिष्टय़े अंगभूतच होती. त्या जोरावर त्यांनी विविध कलामाध्यमे गाजवली.

आज संकेतस्थळांद्वारे नाटक-सिनेमाची तिकिटे विकली जातात. त्याच प्रकारे त्या काळी नाटकांची तिकिटे फोटो स्टुडिओत विकण्याची कल्पना मयेकरांनी राबवली होती. समाजसेवेचाही त्यांचा पिंड होता. कोकणातील चेंदवणचे देवी माऊली माध्यमिक विद्यालय व मुंबईतील चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळाचे ते अध्यक्ष होते. एक कलाकार म्हणून ९० वर्षांचे समृद्ध आणि सार्थक आयुष्य ते जगले.