News Flash

पं. नाथराव नेरळकर

भारतातील महत्त्वाच्या संगीत महोत्सवांत त्यांनी आपली कला सादर केली

पं. नाथराव नेरळकर

संगीताची दुनिया विश्वव्यापी असते. महाराष्ट्राच्या सर्व भागांत संगीताची गंगा कितीतरी आधीपासून कमी-अधिक प्रमाणात पोहोचली, याचे खरे श्रेय विष्णु दिगंबर पलुसकरांना द्यायला हवे; अन्यथा नांदेडमध्ये राहून संगीतसाधना करणारे कृष्णनाथ ऊर्फ नाथराव नेरळकर कलावंत म्हणून ओळखले गेले नसते. मराठवाडा रझाकारांच्या अमलाखाली राहिलेला प्रदेश. काहीसा उशिराने महाराष्ट्राचा तो भाग झाला असला तरी त्यात एक सांध होती. आजही ती कमी-अधिक अंशी अनेक क्षेत्रांत जाणवते. विशेषत: कलाक्षेत्रात. जागतिक कीर्तीच्या कलावंतांना मराठवाड्यातील रसिकतेचा थांग मोजायचा असायचा तेव्हा त्यांच्याजवळ ती सांध मिटवणारा एक चेहरा होता… पं. नाथराव नेरळकर यांचा. पं. भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर, पं. जसराज, झाकीर हुसेन, हरिप्रसाद चौरसिया अशा  कलाकारांसह माजी पंतप्रधान नरसिंह रावांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व मराठवाड्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावायचे ते पंडितजींकडे पाहूनच. अंबड, नांदेडसारख्या शहरातील ‘शंकर दरबार’ इ. महोत्सवांचे नाव राज्यभर पोहोचवण्यात नाथरावांचे मोठे योगदान होते. मराठवाडा संगीत प्रसारक मंडळाची स्थापना करून त्यांनी येथल्या मातीत संगीत रुजवले. उस्मानाबाद जिल्ह््यातील तेरखेडा हे एक लहानसे खेडे शास्त्रीय संगीताची अभिरुची ग्रामीण भागातील रसिकांमध्ये रुजावी म्हणून पंडितजींनी दत्तक घेतले. त्यांच्याच पुढाकाराने तिथे संगीत मैफिली होऊ लागल्या. नांदेडमधील डॉ. अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे गायनाचे धडे गिरवलेल्या नाथरावांनी औरंगाबादेत स्थायिक झाल्यावर सरस्वती भुवन महाविद्यालयात अध्यापन करताना व घरातही गुरुकुल पद्धतीने गायनदीक्षा देण्याचे काम सुरूच ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. औरंगाबादमधील हिंदुस्थानी संगीत विद्यालयाच्या स्थापनेने त्यांच्या अध्यापनाचा लाभ अनेकांना मिळाला. भारतातील महत्त्वाच्या संगीत महोत्सवांत त्यांनी आपली कला सादर केली. त्यामुळे ‘मैफली गवय्या’ आणि उत्तम गुरू म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर पसरला. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चतुरंग पुरस्कार आदी गौरव त्यांच्या वाट्याला आले, ते त्यांच्या या कार्यामुळेच. ख्याल, ठुमरी, तराणा, भावगीत, नाट्यगीत, भजन, गजल अशा सगळ्या संगीतप्रकारांवर नाथरावांची पकड होती. संगीतात कलावंत गुरूच्या नावाने ओळखला जातो. नाथरावांनी त्यांचे गुरू डॉ. अण्णासाहेब गुंजकर यांचे नाव उज्ज्वल केले. त्यांचे अनेक शिष्यगण आज त्यांचे नाव संगीत क्षेत्रात गाजवत आहेत. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील संगीत क्षेत्रातील एक मोठा कलावंत हरपला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 12:01 am

Web Title: pt nathrao neralkar profile abn 97
Next Stories
1 नवल अल सदावी
2 विलास वाघ
3 लक्ष्मीप्रिया महापात्र
Just Now!
X