इतिहासाविषयी सातत्याने संशोधन आणि चिकित्सा म्हणजेच इतिहासाचा ‘अभ्यास’. तो सतत होत राहणे व त्यातून उलगडणारे सत्य आणि तथ्य स्वीकारणे हे परिपक्व संस्कृती आणि जबाबदार समाजाचे लक्षण. त्याऐवजी इतिहास म्हणजे काहीतरी ‘देदीप्यमान कालखंडाचा जाज्वल्य अभिमानाचा दस्तावेज’ अशी समजूत करून घेतल्यास भ्रमनिरास होऊ शकतो. विद्यमान मानवाच्या उत्क्रांतीनंतर ज्यावेळी समाज आणि संस्कृतीविषयी भान निर्माण होऊ लागले, तो किंवा ते कालखंड टप्प्याटप्प्याने विकसित होत गेले. ‘जाहल्या काही चुका’ हे या सर्वच कालखंडांविषयी म्हणता येईल. यांतील कोणताही कालखंड हे सुवर्णयुग वगैरे अजिबात नव्हते. इतिहास हा मिथके आणि गृहीतकांवर नव्हे, तर पुरावे आणि सत्यांशाच्या आधारे लिहावा-अभ्यासावा लागतो. सत्याविषयी अशा प्रकारे आग्रह, मिथकांविषयी पुराव्याधारित तुच्छता आणि ‘सुवर्णयुग पुनरुज्जीवन’वाद्यांशी आयुष्यभर उभा दावा मांडलेले इतिहासकार प्रा. द्विजेंद्र नारायण तथा डी. एन. झा यांचे नुकतेच निधन झाले. पुनरुज्जीवनवादाला राजकीय अधिष्ठान आणि छद्मविज्ञानासारखा विद्वज्जनाश्रय मिळण्याच्या काळात त्यांचे असे जाणे खेदजनक आहे.

गोमांस भक्षण आणि अयोध्येतील राममंदिराचे नेमके स्थान यांविषयी त्यांनी केलेले सखोल संशोधन उजव्या विचारसरणीच्या धारकांना अजिबात आवडले नव्हते. परकीय आक्रमकांमुळे या देशाची दैना झाली. तत्पूर्वी म्हणजे मेहमूद गझनवी भारतावर चालून येण्याच्या आधीचा काळ म्हणजे भरतखंडाचे सुवर्णयुग होता, असे काही इतिहासकारांनी लिहून ठेवले. त्यांवर विसंबून तसा दावा करणारे तर असंख्य. प्रा. झा त्यांना विचारतात.. पुरावा काय? पण मग विशेषत स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासकारांनी लिहून ठेवले त्याचे काय? त्यावर झा यांचे उत्तर – ‘ब्रिटिशांच्या अमदानीत अशा प्रकारे सकारात्मक इतिहासचित्रण करणे ही त्यावेळच्या इतिहासकारांची गरज असावी.’ पण ते सुवर्णयुग वगैरे असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. शेवटी सुवर्णयुग म्हणजे तरी काय? सर्वागीण सुबत्ता, संपत्तीचे समन्यायी वाटप, सामाजिक न्याय हेच ना? पण तशी परिस्थिती कोठे होती.. भारतात किंवा कोणत्याही भागात?

या मुद्दय़ावरूनच झा यांच्यातील क्रांतिकारक इतिहासकार पैलूकडे वळावे लागेल. इतिहास म्हणजे आंतरमानवी संबंधांचा, सामाजिक उतरंडी आणि आर्थिक गुंतागुंतीचाही अभ्यास असतो हे झा यांनी अथकपणे संशोधन करून दाखवून दिले. यातूनच वेदिक काळातील गोमांस भक्षणाचे अनेक पुरावे त्यांनी सादर केले. कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी आणि पाटणा विद्यापीठातून प्राचीन व मध्ययुगीन इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर झा दिल्ली विद्यापीठात शिकवू लागले. इंडियन हिस्ट्री काँग्रेस, इंडियन सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अशा व्यासपीठांवर त्यांची सक्रिय उपस्थिती लक्षणीय ठरू लागली. त्यांच्यावर मार्क्‍सवादाचा प्रभाव होता. पण म्हणून एका कंपूवर टीका करण्यासाठी त्यांनी दुसरा कंपू निवडला नाही! अत्यंत ऋ जू स्वभाव आणि कोणत्याही दाव्याचा प्रतिवाद पुरावे सादर करूनच, नम्रपणे करणे ही खासियत. कुठेही तुच्छतामूलक आत्मप्रौढी नाही. त्यांचा हा गुणही त्यांच्या टीकाकारांनी कणभर स्वीकारला, तर त्यातून ज्ञानार्जनच साधेल!