18 July 2019

News Flash

क्विन्सी जोन्स

सर्वच लोकप्रिय अमेरिकी संगीताची मुळं ही कृष्णवर्णीय आणि भटक्यांपासून सुरू होतात.

क्विन्सी जोन्स

सर्वच लोकप्रिय अमेरिकी संगीताची मुळं ही कृष्णवर्णीय आणि भटक्यांपासून सुरू होतात. महायुद्धपूर्व काळातील मंदीपर्यंत या भटकबहाद्दरांनी लोकगीतांचा प्रवाह शतकांपासून वाहवत नेला. महायुद्धोत्तर काळातील पिढीने या वारशाला आणि आपल्या रक्तातील संगीताला झळाळी दिली. क्विन्सी जोन्स या पिढीचा लखलखता प्रतिनिधी म्हणावा लागेल. रे चार्ल्स या अंध पियानोवादकापासून मायकेल जॅक्सनसह कित्येक कृष्णवंशीय कलावंतांना यशोशिखरांकडे घेऊन जाणारा पथदर्शक म्हणून कार्यरत राहिलेल्या या कलाकाराने या आठवडय़ात २८वे ग्रॅमी पारितोषिक पटकावले.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी शिकागो शहरात जन्मलेल्या क्विन्सी जोन्स यांच्या कुटुंबावर जगण्यासाठी मोठय़ा स्थलांतराला सामोरे जावे लागले. शेजारच्या  जॅक्सन नावाच्या बाईंसोबत धार्मिक गीते गाणाऱ्या आईने सहा-सात वर्षांचा असताना त्याला संगीतदीक्षा दिली. संगीतामध्ये बस्तान बसावे म्हणून सिएटल विद्यापीठातून संगीतामध्ये पदवी घेतली. या शिक्षणानंतर शिष्यवृत्त्या मिळवत क्विन्सी क्लबमधील वाद्यसंगीतापासून ते सिनेमांतील संगीत संयोजनाच्या जबाबदाऱ्या सहज पेलू लागला. बॅण्डलीडर, ट्रम्पेटवादक, पियानोवादक अशा वेगवेगळ्या पदांवर गोऱ्या आणि काळ्या कलाकारांना साथसंगत करू लागला. साठच्या दशकात क्विन्सी जोन्स हे अमेरिकी संगीतपटलावरील आत्यंतिक महत्त्वाचे नाव बनले. या बंडखोर आणि व्यक्तिकेंद्री युगात साहित्यासोबत संगीत आणि चित्रपटाच्या क्षेत्रांत कृष्णवंशीय कलावंतांनी जॅझ, हिप-हॉप संगीताच्या परंपरांना नवतेचा मुलामा चढविला. त्याचे प्रेरणास्थान प्रामुख्याने क्विन्सी जोन्स हे होते. जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या कलाकारांच्या गाण्यांमध्ये संगीत संयोजन लीलया हाताळत पुढच्या टप्प्यात सिनेमांच्या पाश्र्वसंगीताकडे त्यांनी आपले लक्ष वळवले. तेथेही एकाच वर्षी दोन वेळा ऑस्करसाठी मानांकित होण्याचे भाग्य त्यांना लाभले. १९७०च्या दशकात मेंदूला झालेल्या आजारावर मात करून ते पुन्हा संगीतविश्वात आले. या वेळी त्यांनी जॅझ संगीताशी फारकत घेऊन पॉप कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले. १९८०च्या एमटीव्हीने तयार होणारा संगीत रागरंग त्यांनी आधीच ओळखला होता. पुढे मायकेल जॅक्सनच नाही तर कित्येक कलाकारांना पुढे आणण्यात, त्यांच्या संगीत ताफ्याचे संचालन जुळवण्यात आयुष्याची पंचाऐंशी वर्षे या कलाकाराने झिजवली आहेत. तीन लग्ने आणि पाच महिलांपासून सात मुले असा कुटुंब ताफा असलेला हा कलाकार लोकप्रियतेच्या तुलनेत वादशून्य आयुष्य जगत आहे.

First Published on February 14, 2019 1:23 am

Web Title: quincy jones profile