प्रचलित अर्थचक्रात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा बरा-वाईट परिणाम सर्वात आधी ग्राहकावर व्हायचा. मग ती वीज दरवाढ असो किंवा रिक्षाच्या दरातील वाढ. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील दरवाढ, बँकेचे व्याजदर, विमा योजना, अन्नपदार्थातील भेसळ, वजनमापातील फसवणूक, फसव्या जाहिराती अशा अनेक समस्यांना ग्राहक सातत्याने बळी पडायचे. परंतु त्यांना त्यांच्या अधिकाराची फारशी जाण नव्हती. अशा या ग्राहक अधिकाराबाबत अज्ञानाच्या काळात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय उपाख्य राजाभाऊ  पोफळी यांनी या चळवळीला लोकाभिमुख केले. राजाभाऊ  पोफळी हे ग्राहक हक्क चळवळीचेच दुसरे नाव वाटावे इतके ते या चळवळीशी एकरूप झाले होते. प्रत्येक व्यापारी हा आधी ग्राहक असतो, हे त्यांचे आग्रही मत ते प्रत्येक व्यासपीठावर मांडायचे. पोफळी यांनी ‘दै. महाराष्ट्र’मधून पत्रकारितेस प्रारंभ केला. त्यानंतर हिंदुस्थान समाचार, युगधर्म या वर्तमानपत्रांसाठी जिल्हा वार्ताहर म्हणून काम करून ते ‘दै. तरुण भारत’मध्ये ‘ग्राहकी’ या स्तंभातून पी. रमण या नावाने, तर ‘कामगार जगत’ या स्तंभातून ‘श्रमिक’ या टोपणनावाने स्तंभलेखन केले. लेखनकार्य ऐन भरात असताना भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांना कामगार आंदोलनात आणले. ग्राहक या घटकाचा विचार पहिल्यांदा राजाभाऊंच्या डोक्यात चमकला तो याच कामगार आंदोलनात. त्यांनी स्वत:च याविरुद्ध चळवळ उभारण्याचे ठरवले. यातूनच १९७१-७२ मध्ये नागपुरात उपभोक्ता मंच उभे राहिले. सुरुवातीला केवळ विदर्भ हे कार्यक्षेत्र असलेल्या या मंचाचे काम वाढले आणि १९७४ मध्ये अखिल भारतीय ग्राहक परिषद जन्माला आली. राजभाऊंनी या चळवळीच्या आधारे शासनदरबारी पाठपुरावा करून ग्राहक हिताचा कायदा करून घेतला. ज्याचा लाभ आज समाजाला होत आहे. कामगार चळवळीचे अभ्यासक म्हणून त्यांचा आयटक, इंटक, हिंद मजदूर सभा, भारतीय मजदूर संघ आदी कामगार संघटनांशी संबंध आला. नागपूर कन्झ्युमर्स फोरम, विदर्भ उपभोक्ता संघ, दूध उपभोक्ता संघ, वीज उपभोक्ता संघ आदी संघटनांच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. ग्राहक चळवळीवरील ‘शासन व ग्राहक कल्याण’, ‘ग्राहक विचार’, ‘ग्राहक कार्यकर्ता-रीती आणि नीती’ ही त्यांची पुस्तके संदर्भग्रंथ ठरावीत इतकी महत्त्वाची आहेत. त्यांना २०११ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार तसेच २०१२ मध्ये बापू लेले स्मृती राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने ग्राहक चळवळीचा वैदर्भीय आधारवड हरवला आहे.