अवकाश संशोधनातून निर्माण झालेले तंत्रज्ञान हे सरतेशेवटी पृथ्वीवरील माणसासाठी उपयोगी पडत असते. त्यामुळे त्याचा रोजच्या जीवनाशी काही संबंध नाही, असे समजणे चुकीचे आहे. या क्षेत्रातील शोधांमुळे मानवाचे जीवन नकळत सुकर झाले आहे. नासा ही अमेरिकी संशोधन संस्था आगामी अवकाश मोहिमांसाठी वेगवेगळ्या कल्पनांचा शोध घेत असते, त्यासाठी आयोजित केलेल्या अभिनव तंत्रज्ञान संकल्पना स्पर्धेत भारतीय वंशाचे रत्नकुमार बुग्गा यांना संशोधनासाठी एक लाख डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे.
ते पॅसाडेना येथे नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीत पायाभूत तंत्रज्ञान विकासकामात संशोधन करीत आहेत. शुक्रावरील संशोधनासाठी जे शोधक यान पाठवले जाईल त्याला इंधन व वीजपुरवठा करणारी यंत्रणा कशी तयार करता येईल, याची संकल्पना त्यांनी मांडली आहे. बुग्गा हे मूळ आंध्र प्रदेशचे. पूर्व गोदावरी जिल्ह्य़ात दोवलायस्वरम येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर कुर्नुल जिल्ह्य़ातील सिल्व्हर ज्युबिली महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. पदवी घेतली. अनंतपूर जिल्ह्य़ातील एस.व्ही. विद्यापीठातून रसायनशास्त्रात एम.एस्सी. तर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमधून विद्युत रसायनशास्त्रात पीएच.डी. केली.
बुग्गा यांनी मंगळ यानासाठी कमी तापमानाला पुनर्भारित होणाऱ्या लिथियम आयनच्या बॅटऱ्या तयार करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मंगळ संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या रोव्हर गाडय़ा व लँडर अवकाशयाने यांच्या लिथियम बॅटरीज त्यांनी तयार केल्या आहेत. सूक्ष्मजीवांमध्ये काही बदल घडवून अवकाशयानातील इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा मंगळावर फेरवापर करण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे. डीप स्पेस २ मोहिमेतील बॅटरीचे आयुष्य वाढवण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. बुग्गा यांना टेनिस, पर्वतारोहण, दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत यांची आवड आहे. रोज नवीन काहीतरी शिका असे त्यांचे म्हणणे आहे. विद्युत रसायनशास्त्रात संशोधन करताना नेहमीच आनंद वाटत आला आहे. त्याचबरोबर नासात काम करताना नेहमीच समाधान मिळाले असे ते सांगतात. मंगळासारख्या दूरच्या ग्रहावर आपण लाखो मैल अंतर पार करून रोबोट पाठवू शकतो, तेथे त्यांना उतरवून वेगवेगळे प्रयोग करू शकतो व त्यातील माहिती पृथ्वीवर येते हे सगळे त्यांनाही अद्भुत वाटते. लिथियम आयन बॅटरीचा वापर अवकाशयानात करणे व कमी काळात या बॅटरी तयार करणे व त्यांची कार्यक्षमता वाढवणे ही आव्हाने त्यांच्यासमोर सध्या आहेत.
गेली २० वर्षे ते लिथियम बॅटरीजवर काम करीत आहेत व त्यात होत गेलेले तांत्रिक बदल अनुभवताना वेगळा आनंद मिळाल्याचे ते सांगतात.