02 March 2021

News Flash

रवी पटवर्धन

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत काम करत असतानाच त्यांची इहयात्रा संपली.

रवी पटवर्धन

 

उत्तम भारदस्त व्यक्तिमत्त्व, आवाजात कमालीची जरब, झुबकेदार मिशा.. अशा माणसाला साधारणत: ज्या प्रकारच्या भूमिका दिल्या जातात, तशा त्या ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना मिळाल्या तर त्यात नवल नाही. अशा काही शैलीदार अभिनयाची मागणी असणाऱ्या भूमिकांतून ते शोभलेही. परंतु त्याहीपलीकडे जाऊन त्यांनी हरएक प्रकारच्या भूमिका करण्याचा सोस नेहमी बाळगला आणि त्यात ते यशस्वीदेखील झाले. लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या ‘प्रिझन डायरी’च्या पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या ‘स्वगत’ या भाषांतरावर आधारित एकपात्री प्रयोग करण्याचे आव्हान रवी पटवर्धन यांनी लीलया पेलले. सौम्य, शीतल व्यक्तिमत्त्वाच्या जयप्रकाश नारायण यांचे आणीबाणीच्या काळातील तुरुंगवासातले मनोगत त्यातून उत्कटतेने उलगडले होते. या प्रयोगाची एक खासियत म्हणजे हिंदी चित्रपट संगीतकार जयदेव यांनी त्याचे संगीत केले होते आणि झरिन दारुवाला, पं. शिवकुमार शर्मा व हरिप्रसाद चौरसिया यांचे त्यात वादक म्हणून योगदान होते. या आगळ्या ‘प्रयोगा’चे साक्षीदार होण्याचे भाग्य रसिकांना मिळाले. रवी पटवर्धन यांचे भाग्यही थोर! आयएनटीच्या ‘कोंडी’ या नाटकात त्यांना बंगाली रंगभूमीचे भीष्मपितामह शंभू मित्रा यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. आणि सतीश दुभाषींसारखा तालेवर नट समोर असतानाही शंभू मित्रा यांना रवी पटवर्धन यांनी वठवलेली यातली भूमिका अधिक भावली होती. रवी पटवर्धन यांची कारकीर्द प्रदीर्घ म्हणावी अशीच! नाटके, मराठी-हिंदी चित्रपट, मालिका अशा सगळ्या क्षेत्रांतून मुशाफिरी करतानाही त्यांनी आपल्याला ‘टाईपकास्ट’ होऊ न देण्याचे पथ्य जाणीवपूर्वक पाळले. १९७४ साली रत्नाकर मतकरींच्या ‘आरण्यक’ या नाटकात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर वयाच्या ८२ व्या वर्षी पुनश्च या भूमिकेचे आव्हान त्यांनी त्याच तडफेने स्वीकारले; यशस्वीही करून दाखविले. खरे तर त्यांना यावेळी  वयोवृद्ध धृतराष्ट्र साकारताना वय आणि प्रदीर्घ अनुभव यांचा दुहेरी लाभ झालाच, परंतु त्यांच्या कमावलेल्या आवाजाचीही त्यांना भरभक्कम साथ कायम होती, हे अधिक लोभसवाणे. आजन्म विद्यार्थीवृत्तीची चुणूक त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी संस्कृत आणि उर्दूच्या केलेल्या अभ्यासातून दिसून येते. वयपरत्वे कमी झालेल्या कामांमुळे मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी शंृगेरी मठाच्या परीक्षेत भगवद्गीतेचे सातशे श्लोक पाठ करून पहिला क्रमांक पटकावला. शेवटपर्यंत कार्यरत राहता येणे हे भाग्य मानल्यास, याबाबतीत ते भाग्यवान ठरले. ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत काम करत असतानाच त्यांची इहयात्रा संपली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:01 am

Web Title: ravi patwardhan profile abn 97
Next Stories
1 धर्मपाल गुलाटी
2 पापा बौबा डिऑप
3 मासातोशी कोशिबा
Just Now!
X