गेल्या काही वर्षांत योग साधनेला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. पण जेव्हा योगविषयी लोकांमध्ये फारशी माहिती नव्हती, असले तर अज्ञानच होते, अशा काळात शहर-खेडय़ांमध्ये त्याच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य करणाऱ्यांमध्ये योग तज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. ‘निरोगी राहू या – आनंदाने जगू या’ हा केवळ विचार न राहता सामान्यांच्या जीवनातील ते एक वास्तव व्हावे, या हेतूने डॉ. गुंडे यांनी गेली चार दशके अथक कार्य केले. त्यांच्या या कार्याची व्याप्ती आज विदेशातही पोहोचली आहे.

‘मास्टर ऑफ सर्जरी’ ही पदवी प्राप्त केलेल्या डॉ. गुंडेंना ३५ व्या वर्षी मानदुखी झाली. प्रचलित ऑलोपॅथिक पद्धतीने त्यात फारसा फरक पडत नसताना एका रुग्णाच्या सल्ल्यानुसार ते योगसाधनेकडे वळले आणि मानदुखीतून कायमचे मुक्त झाले. त्यांनी स्वत:च घेतलेल्या या अनुभूतीने त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. त्यांनी या योगसाधनेलाच जीवितकार्य मानून संशोधन, प्रसारासाठी आपले जीवन वाहिले. या विषयात डॉ. एच. एन. फडणीस यांच्या रूपाने त्यांना उत्तम गुरू भेटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग त्यांनी योगाध्यायाची आसने गिरवली. गुरूकडून विद्या घेत असतानाच ते या विषयातील एक मोठे गुरू बनले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘जी. जे. जी. योग अ‍ॅकेडमी’द्वारे योगासने, प्राणायाम, उपचार यांचे मोठे कार्य त्यांनी आरंभले. सुरुवातीला भवतालच्या समाजातून मिळणारा प्रतिसाद हळूहळू वाढत जाऊन पुढे तो देशभर विस्तारत गेला. विदेशातही ते योगाचे धडे देण्यासाठी जाऊ लागले. योग साधनेबरोबरच ताण कमी करण्यासाठी ‘आनंदी जगण्याची कला’ या विषयावर ते अखंडपणे मार्गदर्शन करत होते. योगसाधना म्हणजे केवळ योगासने वा प्राणायाम साधना नव्हे, तर ती एक आनंदी जगण्याची कला आहे, असे ते नित्य जगत आणि सांगत.   माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्याकडून हे योग उपचार घेतले. त्यांच्या संस्थेतर्फे त्यांनी गेली २० वर्षे या  विषयाला वाहिलेले ‘योग वार्ता’ नावाचे मासिक चालविले. या विषयावर त्यांनी विविध लेख, पुस्तके व अन्य माध्यमातून लेखन केले. चित्रफिती तयार केल्या. शेकडो व्याख्याने दिली.  डॉ. गुंडे यांच्या या निर्व्याज कार्याची नोंद घेत त्यांना अनेक संस्थांनी गौरवले. पुरस्कारांनी मानांकित केले. एका साध्या मानदुखीतून योग साधनेकडे वळालेले हे वैद्यक पुढे मोठे योगतपस्वी झाले.  ‘आरोग्यासाठी चाला’ असा संदेश घेत नुकतेच ते केरळमध्ये गेले होते. ही मोहीम सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केवळ ‘निरोगी राहू या – आनंदाने जगू या’ या धारणेने जगणाऱ्या डॉ. गुंडे यांनी अखेरचा श्वासदेखील या योगलयीतच घेतला.