‘नाटकातच खरा अभिनय शिकता येतो..’ ही वडिलांची शिकवण शिरसावंद्य मानून रोहिणी हट्टंगडी यांनी पुण्यात घराजवळच असलेल्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये जात, पुढे थेट ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश घेण्यासाठी दिल्ली गाठली आणि त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. इब्राहिम अल्काझींसारख्या नाटय़गुरूच्या मार्गदर्शनाखाली नाटय़शास्त्राचे धडे गिरवण्याचे भाग्य त्यांना लाभले. तिथून पदवी घेऊन बाहेर पडताना त्यांच्या खाती सर्वोत्तम अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थी असे दोन पुरस्कार जमा होते आणि पुढे जाऊन ज्यांना त्यांनी आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडले, ते दिग्दर्शक जयदेव हट्टंगडी हेही त्यांच्यासमवेत एनएसडीतच त्यांचे सहाध्यायी होते. त्यांनाही तेव्हा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. रोहिणीताईंनी काही काळ कथकली आणि भरतनाटय़म्चेही प्रशिक्षण घेतले होते.

मुंबईत आल्यावर त्यांनी ‘आविष्कार’ या संस्थेतून ‘चांगुणा’ हे नाटक सादर केले. फेदेरिको गार्सिया लॉर्काच्या ‘येर्मा’ या स्पॅनिश अभिजात नाटकाचा तो भारतीय अवतार होता. या नाटकासाठी त्यांना राज्य नाटय़स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नंतर त्यांनी नितीन सेन यांच्या बंगाली कथेवर आधारित ‘अपराजिता’ हे एकपात्री नाटक केले. नंतर तेंडुलकरांचे ‘मित्राची गोष्ट’, ‘मिडीआ’, ‘वाडा भवानी आईचा’, इप्टानिर्मित प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ कथेवर आधारित ‘होरी’ अशा अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. के. शिवराम कारंथ यांच्या ‘यक्षगान’ लोकनाटय़प्रकारात स्त्रीकलाकाराने काम करण्याचा अग्रमान रोहिणीताईंना लाभला. जपानी ‘काबुकी’ नाटकात काम करणारी पहिली आशियाई अभिनेत्री त्या होत.

त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली ती रिचर्ड अ‍ॅटनबरोंच्या ‘गांधी’ चित्रपटाने! ऐन तरुण वयात गांधीजींची धर्मपत्नी कस्तुरबा साकारण्याची संधी रोहिणीताईंना मिळाली आणि त्यांनीही या संधीचे सोने केले. या भूमिकेसाठी त्यांना ‘बाफ्टा’ पुरस्कारही मिळाला. ‘गांधी’ने त्यांना जागतिक सिनेमाच्या क्षितिजावर पोहोचवले, तरी त्यानेच त्यांच्यावर ऐन तरुणपणी वयस्क भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणून अमीट शिक्का बसला. त्यापायी ‘हीट अ‍ॅण्ड डस्ट’सारख्या सिनेमात त्यांना भूमिका मिळू शकली नाही. अपत्यवियोगाचे दु:ख भोगणाऱ्या वयस्क जोडप्याची कथा असलेल्या आणि अनुपम खेर यांचा पदार्पणाचा सिनेमा ठरलेल्या ‘सारांश’मध्ये रोहिणीताईंनी संस्मरणीय भूमिका साकारली. त्या काळच्या समांतर चित्रपटधारेतील ‘अरविंद देसाई की अजीब दास्ताँ’, ‘अल्बर्ट पिंटो को घुस्सा क्यों आता है’, ‘मोहन जोशी हाजीर हो’, ‘अर्थ’, ‘पार्टी’ यांसारख्या चित्रपटांच्या त्या भाग होत्या. ‘अग्निपथ’, ‘चालबाझ’, ‘जलवा’ यांसारखे तद्दन धंदेवाईक चित्रपटही त्यांनी केले. पुढे खासगी चित्रवाहिन्यांचे आगमन झाल्यावर त्या माध्यमातही त्यांनी आपली छाप पाडली. ‘चार दिवस सासूचे’, ‘वहिनीसाहेब’ आदी त्यांच्या मालिका लोकप्रियही झाल्या.

एकीकडे सिनेमा, मालिका करत असतानाच त्यांनी जयदेव हट्टंगडीसोबत स्थापन केलेल्या ‘कलाश्रय’ या संस्थेद्वारे नाटक आणि अन्य कलांचे संशोधन, सादरीकरणही त्या करत होत्या. २००४ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. नाटक- चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड्सनी त्या आधीच सन्मानित झाल्या होत्याच; नुकतेच विष्णुदास भावे पुरस्कार या महाराष्ट्रीय रंगभूमीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांच्या संपूर्ण अभिनयकीर्दीचा हा सर्वोच्च गौरव आहे!