23 October 2018

News Flash

पं. उल्हास बापट

जगातल्या उत्तम संतूरवादकांपैकी एक असा त्यांचा लौकिक झाला,

पं. उल्हास बापट

वडील पोलीस खात्यात अधिकारी असल्याने हाती संगीताचे एखादे वाद्य येणे ही तशी दुरापास्त म्हणावी अशी गोष्ट. त्यातून महाराष्ट्री माहीत नसलेले आणि वाजवण्यास अतिशय अवघड असलेले संतूरसारखे काश्मिरी वाद्य हाती घेऊन त्यावर आपल्या साऱ्या आयुष्याचा भार टाकून द्यावा, असा विचार बापट कुलोत्पन्नात होणे, हेही तसे अक्रीतच. पोलिसात असूनही कलावंत म्हणून जगलेले यशवंत बापट यांच्यामुळेच ते शक्य झाले. उल्हासजींनी गायक म्हणून नाव कमावण्याचे ठरवले होते, त्यासाठी आधी तालवाद्याचे शिक्षण आणि नंतर वडिलांकडे, सरोदवादक झरीन दारूवाला, पं. के. जी. गिंडे, वामनराव सडोलीकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेताना संतूरसारख्या वाद्याच्या प्रेमात पडलेल्या उल्हासजींनी मग त्या वाद्यावर अफाट मेहनत घेतली. जगातल्या उत्तम संतूरवादकांपैकी एक असा त्यांचा लौकिक झाला, तो या मेहनतीमुळे.

सत्तरच्या दशकात संतूरने काश्मीर सोडून मुंबईत आगमन केले होते आणि त्या वाद्यामधील स्वरांची तरलता चित्रपट संगीताच्या क्षेत्रातील संगीतकारांना इतकी भावली की, हे वाद्य अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले. आर. डी. बर्मन यांच्या संपर्कात आलेल्या बापटांना मग आरडींनी कधीच सोडले नाही. अनेक संगीतकारांच्या गळ्यातले ताईत होण्याचे भाग्य उल्हासजींच्या वाटय़ाला आले. याचे कारण त्यांच्याकडे असलेली सर्जनक्षमता आणि नेमकेपणा. चित्रपट संगीत हे मुळी प्रतिभावंतांचे संमेलन असण्याचा तो काळ होता. सगळे वादक, गायक आणि संगीतकार यांनी एकत्र येऊन एका गीतासाठी तासन्तास आपली प्रतिभा एकवटायची असे. उल्हासजींनी अशा अनेक गीतांमध्ये आपली जी मोहोर उमटवली आहे, ती अजरामर म्हणावी अशी. काश्मीरमधील लोकवाद्य असलेले हे वाद्य भारतीय अभिजात संगीताच्या दरबारात स्थानापन्न करण्याचा मान पं. शिवकुमार शर्मा यांचा. शततंत्री वीणा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकसंगीताच्या साथीला उपयोगात येणाऱ्या या वाद्यातील एवढय़ा तारा सुरात जुळवून त्यावर रागदारी संगीत निर्माण करण्याचे मोठे आव्हान त्यांनी पेलले आणि संगीताच्या मैफलीत संतूर हे अविभाज्य बनले. उल्हासजींनी या एवढय़ा तारा सतत सुरात ठेवण्यासाठी करावी लागणारी कसरत कमी करण्यासाठी स्वत:ची एक पद्धत शोधून काढली. त्यामुळे प्रत्येक रागासाठी पुन्हा सगळ्या तारा नव्याने जुळवण्याची गरज भासेनाशी झाली. या क्रोमेटिक टय़ूनिंगचे प्रात्यक्षिक हा बापट यांचा अतिशय आवडता छंद.  ‘संतूरच्या भावविश्वात’ हे त्यांचे ध्वनिमुद्रण म्हणून सगळ्यांनी आवर्जून ऐकावे असे. श्रावणात घननिळा, समईच्या शुभ्रकळ्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, मी मज हरपून यांसारख्या किती तरी मराठी भावगीतांमध्ये उल्हासजींच्या संतूरने इतकी मोठी गुणात्मक भर घातली आहे की, त्यामुळे त्या गीतांची झळाळी फारच वाढली. त्यांना संगीताच्या दरबारात रागाशी लडिवाळपणे खेळण्यात अधिक रस होता. मैफलीत हे वाद्य अन्य कोणत्याही वाद्यापेक्षा तसूभरही कमी पडता कामा नये, यासाठी त्यांनी स्वत:चे खास तंत्र निर्माण केले. त्यातूनच तुटक स्वरांना जोडणारी मिंड या वाद्यातूनही काढण्याचे कसब त्यांनी मिळवले. वाद्यावर आणि संगीतावर अपार प्रेम करणाऱ्या उल्हास बापट यांचे निधन ही म्हणूनच अतिशय दु:खद बाब आहे.

First Published on January 6, 2018 2:20 am

Web Title: santoor player ulhas bapat