03 March 2021

News Flash

सर्बानंद सोनोवाल

आसाममधील पहिल्यावहिल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री व कछारी आदिवासी नेते

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल. (संग्रहित छायाचित्र)

आसाममधील पहिल्यावहिल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री व कछारी आदिवासी नेते, आक्रमक व्यक्तिमत्त्व व तितकेच प्रभावी वक्ते ही सर्बानंद सोनोवाल यांची ओळख. या वेळी आसाममध्ये भाजप सरकार येणार अशी सर्वाचीच अटकळ होती, ती खरी ठरली. कारण भाजपने या वेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून सर्बानंद सोनोवाल यांचे नाव जाहीर केले होते.
आसाममधील दिब्रुगड जिल्ह्य़ातील मोलोकगाव येथे ३१ ऑक्टोबर १९६२ रोजी त्यांचा जन्म झाला. स्वच्छ प्रतिमा, पंतप्रधान मोदी यांचा विश्वास या शिदोरीवर ते मुख्यमंत्री झाले. विद्यार्थिदशेत ते ऑल इंडिया स्टुडंट्स युनियन (आसू) या संघटनेत काम करीत होते, १९९२ ते १९९९ या काळात ते या संघटनेचे अध्यक्ष राहिले. ते २००१ मध्ये आसाम गण परिषदेत होते. नंतर भाजपमध्ये आले, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केले. राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. सर्बानंद सोनोवाल हे गुवाहाटी विद्यापीठाचे कायदा विषयाचे पदवीधर आहेत. ईशान्य विद्यार्थी संघटनेचे ते १९९६ ते २००० दरम्यान अध्यक्ष होते. आसाम गण परिषदेतील मतभेदानंतर ते २०११ मध्ये भाजपमध्ये आले व नंतर एकच वर्षांत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनले. २००१ मध्ये ते मोरान मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. २००४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक दिब्रुगड मतदारसंघातून जिंकली. ते भाजपमध्ये आले तेव्हा पक्षाचे खासदार चार होते. २०१४ च्या निवडणुकीत ही संख्या सात झाली, त्यात सोनोवाल यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा होता. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत तेलखीमपूरमधून निवडून आले. तर आताच्या विधानसभा निवडणुकीत माजुली मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सर्बानंद सोनोवाल यांना मासेमारीची आवड आहे. वेळ मिळेल तेव्हा ते त्यांच्या मित्रांसमवेत दिब्रु नदीवर मासे पकडायला जातात. बालपणी त्यांना फुटबॉल घेणे परवडत नव्हते, त्यामुळे ते टांगा हे स्थानिक फळ फुटबॉल म्हणून वापरत. त्यांना पांढरा रंग आवडतो. त्यामुळे घराला पांढरा रंग दिला आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे ते शाळेत असताना तिसरी व चौथीला ते सफाईमंत्री होते. त्यांनी त्यांच्या घरात वातानुकूलक बसवलेला नाही कारण आपणही सामान्य माणसासारखेच राहावे असे त्यांना वाटते. वेगवान मोटारी व बाइक त्यांना आवडतात, त्यांची पोस्टर्स त्यांच्या खोलीत आहेत. मावळते मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी शपथविधी सोहळ्यास हजर राहावे यासाठी सोनोवाल यांनी आवर्जून त्यांना आमंत्रित केले होते. यावरून भविष्यात विरोधी पक्षातील नेत्यांना सोबत घेऊनच राज्याचा विकास करावयाचे त्यांचे इरादे स्पष्ट होतात.
बेकायदा स्थलांतरितांविषयीच्या एका कायद्याला त्यांनी आव्हान दिले होते. तो कायदा अखेर न्यायालयात रद्द झाला. दोन वर्षांत बांगलादेशलगत सीमेवर कुंपण घालून घुसखोरी रोखण्याची पहिलीच घोषणा त्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 2:49 am

Web Title: sarbananda sonowal
Next Stories
1 सुव्रत महादेवन
2 शहीद पांडुरंग गावडे
3 पिनरायि विजयन
Just Now!
X