‘विज्ञानात खरोखर रुची असेल तरच संशोधन क्षेत्रात या; आलात तर परीक्षेतील गुणांची काळजी करत बसू नका, तुम्ही ज्ञानार्जनासाठी  आला आहात हे विसरू नका’, असा परखड सल्ला देणारे जैववैज्ञानिक डॉ. शेखर मांडे हे ‘हाडाचे’ वैज्ञानिक आहेत. पेशी विज्ञान व जनुकीय विज्ञानात त्यांनी केलेले संशोधन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावले आहे. त्यांची वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआरच्या महासंचालकपदी झालेली निवड त्यामुळेच विज्ञान संशोधनातील या  महत्त्वाच्या संस्थेला नवी दिशा देणारी ठरणार आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यानंतर हे पद पुन्हा महाराष्ट्राकडे आले आहे. डॉ. मांडे हे गेली २० वर्षे संशोधन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी पेशी विज्ञान  व जनुकीय विज्ञानात नजरेत भरणारी कामगिरी केली आहे. नागपूर विद्यापीठातून एमएस्सी आणि बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून पीएचडी केल्यानंतर डॉ. मांडे यांनी नेदरलँडस व अमेरिका येथील विद्यापीठात संशोधन केले.  मायदेशी आल्यावर हैदराबादमधील संस्थेत त्यांनी डीएनए फिंगरप्रिंटिंगबाबत संशोधन  केले. त्यानंतर ते पुण्यात राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्राचे संचालक झाले. देशातील विज्ञानजगतात महत्त्वाचा मानला जाणाऱ्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी आणि नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या महत्त्वाच्या विज्ञान संस्थांचे ते मानद सदस्य आणि ‘विज्ञानभारती’या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. साठहून अधिक शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत. विज्ञान संशोधन व प्रत्यक्ष उद्योगांकडून त्यांना मिळणारी साथ याची सांगड घालण्याचे काम ३२ प्रयोगशाळांची मुख्य संस्था असलेल्या सीएसआयआरचे महासंचालक म्हणून त्यांना करावे लागणार आहे.  आधीचे महासंचालक गिरीश सहानी हे ३१ ऑगस्टला निवृत्त झाल्यानंतर हे महासंचालकपद रिक्त होते. डीएनए फिंगरप्रिटिंग व क्रिस्टलोग्राफीत त्यांचे विशेष संशोधन असून,  पेशीविज्ञान केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी भारतीय मानवी मायक्रोबायोम या ईशान्य भारतातील प्रकल्पात मोठी भूमिका पार पाडली. त्यात भारतातील वेगवेगळय़ा वंशाच्या वीस हजार व्यक्तींचे नमुने घेऊन त्यातील जनुकीय माहितीच्या आधारे वंश व जीवनशैलीनुसार मानवात आढळून येणाऱ्या जीवाणू समूहांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून भारतातील जीवाणूजन्य आजारांवर नवी औषधे तयार करणे शक्य होणार आहे. क्षयाच्या मायकोबॅक्टेरियम  टय़ुबरक्युलोसिस जीवाणूच्या प्रथिन रचनेवर त्यांनी संशोधन केले आहे.