जागतिकीकरणाच्या रेटय़ात मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी केवळ कोरडी चिंता व्यक्त न करता स्वभाषेचे अस्तित्व टिकविण्यासाठी भरीव कामगिरी करणाऱ्यांमध्ये बदलापूर येथील श्याम जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. वडील आणि थोरल्या भावाकडून ग्रंथप्रेमाचे बाळकडू मिळालेल्या या चित्रकला शिक्षकाने निवृत्तीनंतरची आपली सारी पुंजी खर्ची घालून बदलापूरसारख्या छोटय़ा शहरात मराठी भाषेचे वैभव असणारे दुर्मीळ आणि अमूल्य अक्षर वाङ्मय त्यांच्या ‘ग्रंथसखा’त संकलित केले. वडिलांच्या निधनानंतर ‘निसर्ग ट्रस्ट’ स्थापन करून त्यांच्या संग्रही असलेली दहा हजार पुस्तके श्याम जोशी यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध करून दिली. ग्रंथालयाच्या जागेसाठी त्यांनी त्यांचा राहता बंगलाही विकला. त्यानंतर अक्षरश: बृहन्महाराष्ट्र पालथा घालून त्यांनी ठिकठिकाणी विखुरलेले मौल्यवान अक्षरधन मिळवले. सध्या त्यांच्या ‘ग्रंथसखा’मध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक पुस्तके असून त्यापैकी निम्म्याहून अधिक दुर्मीळ ग्रंथसंपदा आहे.

बदलापूर परिसरातील पाच हजारांहून अधिक वाचक ‘ग्रंथसखा’चे सभासद आहेत. मात्र हे केवळ वाचनालय नाही. ब्रिटिश राजवटीत छापण्यात आलेल्या दोलामुद्रित शंभर ग्रंथांसह अभ्यासकांना उपयोगी पडतील अशा एक लाखांहून अधिक संदर्भग्रंथांचे स्वतंत्र दालन ‘मराठी, भाषा, इतिहास, संस्कृती संशोधन केंद्र’ या नावाने त्यांनी अभ्यासकांना उपलब्ध करून दिले आहे. मराठीच्या या स्वायत्त विद्यापीठात भाषासमृद्धीसाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात. अनेक नामवंत लेखकांनी त्यांच्याकडचा अमूल्य ग्रंथसंग्रह श्याम जोशी यांना जतन करण्यासाठी दिला आहे. त्यामुळे रवींद्र पिंगे, द. भि. कुलकर्णी, वि. आ. बुवा, निरंजन उजगरे, प्रभुराम जोशी आदी अनेकांच्या संग्रहांतील पुस्तके या स्वायत्त विद्यापीठात अभ्यासकांना आता उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील समग्र कोश त्यांच्या संग्रही आहेत. याशिवाय मराठीतील बौद्ध, ख्रिस्ती, जैन वाङ्मय येथे उपलब्ध आहे. सध्या सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेचे शुद्धीकरण करण्याच्या ते प्रयत्नात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दुकानांच्या पाटय़ा आणि फलक लिहिणाऱ्या कारागिरांना उपयोगी पडेल, असा एक सोप्या आणि अचूक शब्दांचा कोश ते तयार करीत आहेत. नव्या गृहसंस्कृतीत संकुलांना पाश्चात्त्य नावे दिली जातात. विकासकांनी इमारतींना मराठी नावे द्यावीत, त्यासाठीही ते प्रयत्न करीत आहेत. राज्यभरातील २५हून अधिक मोठय़ा रद्दी दुकानदारांच्या ते संपर्कात आहेत. मराठी भाषेतील अनेक अमूल्य अक्षरलेणी त्यांना या रद्दीच्या दुकानांतून मिळाली. ज्ञानेश्वरांच्या काळात १२व्या शतकात प्रचलित असलेली प्राकृत ते आताची २१व्या शतकात बोलली जाणारी मराठी यात खूप फरक आहे. या सुमारे आठ दशकांत मराठी भाषेत झालेले स्थित्यंतर श्राव्य माध्यमातून अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याचीही त्यांची कल्पना आहे. बदलापूरकरांना ‘ग्रंथसखा’ची ओळख व्हावी म्हणून मंगेश पाडगांवकर यांच्या काव्यवाचनाची मैफल त्यांनी आयोजित केली. एक तपानंतर त्यांच्याच नावाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दिला जाणारा पुरस्कार जाहीर करून राज्य शासनाने श्याम जोशींच्या कार्याचा गौरव केला हाही एक योगायोग आहे.

Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!
tadoba andhari tiger reserve marathi news, nagzira sanctuary marathi news
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
uran, Panvel, Pen, Thousands of Objections, Farmers Register, MMRDA Notification, Development, cidco, marathi news,
एमएमआरडीएच्या अधिसूचनेवर ७ एप्रिलपर्यंत हरकती; उरण, पनवेल, पेण तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांकडून हरकतींची नोंद