12 December 2017

News Flash

सर टीम बर्नर्स ली

पहिल्या व्यावसायिक संगणकाचा वापर त्यांचे आई-वडील करीत होते.

लोकसत्ता टीम | Updated: April 12, 2017 3:16 AM

सर टीम बर्नर्स ली

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या वैज्ञानिकांनी जगाला दिशा दिली, त्यात ब्रिटनचे ‘सर’ टीम बर्नर्स ली यांचा समावेश आहे. वर्ल्ड वाइड वेब या माहितीच्या महाजालाचा शोध लावून जगाला स्तिमित करणाऱ्या बर्नर्स ली यांना अलीकडेच असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी या जागतिक संस्थेचा, प्रतिष्ठेचा ए. एम. टय़ुिरग पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे संगणक विज्ञानातील नोबेलच. बर्नर्स ली यांना वर्ल्ड वाइड वेबच्या निर्मितीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पहिल्या वेब ब्राऊजरच्या निर्मितीचे श्रेयही ली यांनाच आहे. सर्न या संस्थेच्या मोठा आवाका असलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने बर्नर्स ली यांनी हे माहितीचे महाजाल निर्माण केले. मार्च १९८९ मध्ये त्यांनी माहिती व्यवस्थापन यंत्रणेचा प्रस्ताव मांडला होता, सध्या ते वर्ल्ड वाइड वेब फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. एनक्वायर हे या माहितीच्या महाजालाचे आधीचे रूप होते.

त्यांचा जन्म लंडनचा. पहिल्या व्यावसायिक संगणकाचा वापर त्यांचे आई-वडील करीत होते. त्यातून संगणक या अनोख्या यंत्राचे कुतूहल त्यांच्या मनात निर्माण झाले. त्यांचे शिक्षण शीन माऊंट प्रायमरी स्कूल व लंडनमधील इमॅन्युअल स्कूल येथे झाले. त्यांना रेल्वे कशी चालते याचेही कुतूहल होते. रेल्वेत इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग कसा केलेला असतो याचा अभ्यास त्यांनी केला होता. ऑक्सफर्डच्या क्वीन्स कॉलेजमधून, भौतिकशास्त्राची पदवी त्यांनी पहिल्या वर्गासह मिळवली. पदवीनंतर अभियंता म्हणून नोकरी धरली नंतर ते फर्नडाऊन येथे डी. जी. नॅश यांच्याबरोबर प्रिंटर्ससाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामात गुंतले. जून ते डिसेंबर १९८० दरम्यान ते जीनिव्हातील सर्नच्या प्रकल्पात ‘माहिती तंत्रज्ञान कंत्राटदार’ बनले. तेथे त्यांनी माहितीच्या महाजालाची निर्मिती केली पण मध्येच त्यांनी जॉन पूल यांच्या इमेज कॉम्प्युटर सिस्टम्स या कंपनीची तांत्रिक बाजू सांभाळली आणि पुन्हा १९८४ साली ते सर्नमध्ये परतले. माहितीच्या महाजालाचे सार्वत्रिकीकरण करणारे संशोधन  त्यांनी केल्यामुळेच जग बदलवणारे ठरले. गतशतकातील ८० सांस्कृतिक घटनांमध्येही इंटरनेटच्या शोधाचा पहिला क्रमांक आहे. माहितीचे महाजाल केवळ तांत्रिक प्रगतीचेच लक्षण नव्हते तर त्यामुळे सर्वानाच व्यक्त होण्यासाठी मुक्त अवकाश मिळाले. या संशोधनाचे ‘पेटंट’ त्यांनी घेतले नाही!

पण प्रत्येक शोधकर्त्यांला त्याने लावलेल्या शोधाचा जेव्हा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ लागतो तेव्हा खंत वाटते तशीच ली यांनाही ती आहे. अलीकडच्या काळात त्यांनी इंटरनेट न्यूट्रॅलिटीचे समर्थन तर केलेच पण समाजमाध्यमांच्या अयोग्य वापराबाबतही त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेतील निवडणूक व ब्रेग्झिटच्या वेळी फेसबुक व ट्विटरवर खोटय़ा बातम्या दिल्या गेल्या. ट्विटर किंवा फेसबुकवर काही वेळा चक्क एखाद्या विषयावर उणीदुणी काढणारी व्यक्तिगत व सामूहिक मोहीम राबवली जाताना दिसते. याविषयी तीन पानांचे पत्र त्यांनी लिहिले असून त्यात माहितीच्या महाजालाबाबत धोक्याचे तीन इशारे दिले आहेत : (१) व्यक्तिगत माहितीवरचे नियंत्रण सुटणे, (२)अनियंत्रित राजकीय जाहिरातबाजी (३) खोटय़ा बातम्यांचा प्रसार.

ली यांना ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर किताब देऊन २००४ मध्ये गौरवले, २०१३ मध्ये पहिला राणी एलिझाबेथ पुरस्कार त्यांना मिळाला. चार्लस बॅबेज पुरस्कार, पॉल इव्हान्स पीटर पुरस्कार, सर फ्रँक व्हिटल पदक, जपान प्राइज, राष्ट्रकुल पुरस्कार, नील्स बोहर सुवर्णपदक असे अगणित पुरस्कार त्यांना मिळाले. ते ब्रिटिश रॉयल सोसायटीचे, तसेच अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेसचे फेलो आहेत. दहापेक्षा अधिक मानद डॉक्टरेट त्यांना मिळाल्या. इंटरनेट हॉल ऑफ फेममध्ये ते झळकले नसते तरच नवल. जगात सकारात्मकतेवर आधारित खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटुंबकम’ संस्कृती फुलवण्याचा त्यांचा प्रयत्न आजही आहे. इंटरनेट सव्‍‌र्हरही प्रत्येकाला निवडता/ बदलता यावेत, यावर ते अद्याप काम करत आहेत.

First Published on April 12, 2017 3:16 am

Web Title: sir tim berners lee