‘किंदुरा’ या कवितेत, कवयित्री मानवी जाणिवा आणि पक्ष्याच्या आकांक्षा असलेली किन्नरी आहे.. या कवितेत ज्या शरीराचे वर्णन आहे, तेही अर्धे मानवाचे, अर्धे पक्ष्याचे- किंवा पूर्णत: पक्षी नाही की मानवही नाही, असे. श्रीलंकेच्या विख्यात इंग्रजी कवयित्री जीन अरसनायगम् यांची १९७३ साली प्रकाशित झालेली आणि त्याही आधी लिहिली गेलेली ही कविता, वरवर पाहता जीन यांच्या कल्पनेचा- फक्त कल्पनेचाच- आविष्कार वाटते; पण आपल्यासाठी कविता म्हणजे निव्वळ कल्पनेची भरारी नसून सामाजिक प्रश्नांच्या कलात्म आविष्काराचे ते साधन आहे, हे जीन यांनीच नंतरच्या कवितांतून दाखवून दिले. त्यामुळे ही ‘किंदुरा’ कवितादेखील, जीन यांना स्वत:च्या वांशिक वैशिष्टय़ांची झालेली जाणीव मांडणारी ठरली. डच आणि सिंहली यांच्या संकरातून झालेल्या ‘बर्घर’ वंशात जीन सॉलोमन म्हणून १९३१ साली त्या जन्मल्या.. जाफन्यातील तमिळ वंशाचे त्यागराज अरसनायगम् यांच्याशी त्यांनी विवाह केला आणि ३० जुलै २०१९ रोजी त्या निवर्तल्या.

मधल्या ८७ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी ५० पुस्तके लिहिली. त्यापैकी सात कवितासंग्रह महत्त्वाचे ठरले, तर ललित गद्यलेखन, समीक्षापर वा आत्मपर लेखन हे प्रकारही त्यांनी हाताळले. श्रीलंकेचा ‘साहित्यरत्न’ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार (२०१७) आणि भारतीय ‘साहित्य अकादमी’ची प्रेमचंद फेलोशिप (२०१४) यांसह अनेक युरो-अमेरिकी अभ्यासवृत्ती स्वरूपाचे मानसन्मान त्यांना मिळाले होते. अर्थात, श्रीलंकेमधील आणि अन्यत्र दिसणाऱ्या वास्तवाकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहणे हाच त्यांचा स्थायिभाव असल्यामुळे त्यांची कविता, त्यांचे गद्यलेखन हे दोन्ही बदलत गेले. ‘किंदुरा’मध्ये कवयित्रीची वांशिक व्यथाच शोधून तेवढेच दु:ख कुरवाळत बसलेल्या समीक्षकांना १९८०च्या दशकातील जीन यांच्या कवितांनी हडबडून सोडले. श्रीलंकेचा ‘ब्लॅक जुलै’ म्हणून आजही ओळखल्या जाणाऱ्या २३ ते ३० जुलै १९८३ या कालखंडातील वांशिक शिरकाणाबद्दल त्यांनी १९८४ मध्ये लिहिलेली ‘अ‍ॅपोकॅलिप्स-८३’ ही कविता ‘अल्पाक्षरी, नादमय आणि आघातमय शब्द वापरणारी’ आहे अशी समीक्षासुद्धा झालीच; पण अल्पसंख्याकांचा द्वेष- मेंदूमेंदूंत घुमणारा अस्मितेचा नाद आणि त्यातून होणारे आघात यांचे विदारक चित्र उभे करणाऱ्या कवितेने ‘रिच्युअल्स ऑफ हेट’ (तिरस्काराचे षोडषोपचार) वेशीवर टांगण्याचे धाडस केले.

जीन यांच्या सर्वच कविता संहाराचे खिन्नगीत नव्हेत. ‘बायकांनी शक्तियाचना करणारी गाणी म्हणायची, तीही दुर्गादेवीपुढेच.. पुरुष देव मात्र त्या वेळी आपापल्या मखरात बसून असतात.. ते या प्रार्थना कधी ऐकतात?’ अशी जाणीव मांडणारी ‘दुर्गा पूजा’ ही कविताही त्यांचीच. त्यांचा काव्यप्रवास हा ‘पंख नसल्याच्या’ आणि ‘निराळेपणाच्या’ आत्मजाणिवेपासून ते प्रत्येकीचा/ प्रत्येकाचा निराळेपणा जपला पाहिजे, या सामाजिक जाणिवेपर्यंत सहजपणे झाला. ‘कवितेत कशाला पाहिजेत सामाजिक जाणिवा?’ या असमंजस प्रश्नाची शेकडो खणखणीत उत्तरे खरे तर आपल्या आसपासच असतात.. त्यापैकी एका उत्तराला, जीन अरसनायगम् यांच्या निधनाने पूर्णविराम मिळाला.