लहानपणापासून ते दोघे बंधू एकत्र वाढले, एकत्र खेळले, नंतर सुफी संगीताच्या दुनियेत दोघांच्या जोडीने नाव कमावले. ही जोडी म्हणजे पंजाबचे वडाली बंधू. त्यांच्यातले प्यारेलाल वडाली यांच्या निधनाने ही गाजलेली जोडी फु टली आहे. या दोघांचे एकमेकांशी नाते इतके निकटचे होते की, जणू त्यांचा आत्माच एक होता; आता त्यातला एक भाग गळून पडला आहे.

पंजाबमधील अमृतसर जिल्ह्य़ात वडाली डोगरण येथे उस्ताद प्यारेलाल यांचा जन्म झाला. दोघे भाऊ  त्या वेळी पहिलवानकी करायचे, पण वडिलांनी त्यांना कान पकडून संगीत शिकायला लावले. प्यारेलाल हे त्यांचे मोठे बंधू पूरनचंद यांनाच गुरू मानत असत. सुरुवातीला या दोघा भावांना वडील ठाकूरदास यांनीच संगीताची तालीम दिली, नंतर पंडित दुर्गादास, उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. पतियाळा घराण्याची स्वरसाधना त्यांनी केली. या दोघांनी बुल्लेशाह, कबीर, अमीर खुसरो व सूरदास यांची पदे संगीतात घोळवून त्यांना वेगळा गोडवा दिला. ‘पिंजर’ चित्रपटातून वडाली बंधू चित्रपटसृष्टीत आले. त्यांना खरे तर चित्रपटात गाण्यामध्ये अजिबात रस नव्हता, पण अखेर ते राजी झाले. ‘तनू वेड्स मनू’- रंगरेज मेरे, ‘मौसम’- तू ही तू ही, ‘पिंजर’- दर्दा मारेया, ‘धूप’- चेहरा मेरे यार का ही वडाली बंधूंची गाणी खूप गाजली. सूफी संगीत गाणाऱ्या त्यांच्या घराण्यातील ते पाचव्या पिढीतले. १९७५ मध्ये त्यांनी जालंधर येथे हरवल्लभ मंदिरात पहिला कार्यक्रम केला, पण त्यापूर्वी त्यांनी हरवल्लभ संगीत संमेलनात कला सादर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना संधी नाकारण्यात आली. ते निराश झाले व मंदिरात त्यांनी जेव्हा कार्यक्रम केला तेव्हा आकाशवाणीच्या एका अधिकाऱ्याने त्यांच्यातील गुण हेरून त्यांना संधी दिली. गुरुबानी, काफी, गझल,भजन हे गीतप्रकार त्यांनी नंतर  अनेक संमेलनांतून सादर केले. त्यांनी लोकसंगीत जितके समरसतेने सादर केले, तितकाच त्यांना अभिजात संगीतात रस होता. पूरनचंद यांचा आवाज काहीसा पहाडी, तर प्यारेलाल यांचा आवाज खोल, सुस्पष्ट, त्यातून सांगीतिक प्रज्ञा नेहमीच डोकावत असे. प्यारेलाल यांनी कधी आवाजातून कसरती करण्याचा प्रयत्न केला नाही.  शुद्ध संगीतासारखा परिणाम कशाचाच नसतो, त्यामुळे त्यात उगाचच तंत्रज्ञानाचा शिरकाव करण्याची गरज नसते असे त्यांचे मत होते. सूफी संगीतात मुळातच आंतरिक शांतीची ताकद असते; ती प्यारेलाल व पूरनचंद यांनी शतगुणित केली. प्रेक्षकांना संगीताच्या धाग्याने एकत्र गुंफत जाण्याची वेगळी हातोटी त्यांना साध्य झाली होती. प्यारेलाल यांच्या जाण्याने सुफी व पंजाबी संगीत, साहित्य जनतेच्या दरबारी नेणारा एक शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.