24 November 2020

News Flash

सुशीला कार्की

नेपाळ हा हिमालयाच्या कुशीतला देश. भारताशी बरीच जवळीक असणारा, राजनैतिकदृष्टय़ाही महत्त्वाचा.

नेपाळ हा हिमालयाच्या कुशीतला देश. भारताशी बरीच जवळीक असणारा, राजनैतिकदृष्टय़ाही महत्त्वाचा. नेपाळच्या अध्यक्षपदी महिलेची निवड झाल्यानंतर आता तेथील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शान वाढवण्याची संधी प्रथमच एका महिलेला मिळाली आहे; तिचे नाव सुशीला कार्की.
महिला सक्षमीकरणाचे प्रयोग या लहान देशांमध्येही होतात हे प्रशंसनीयच. नेपाळच्या महिला सक्षमीकरणाचे कौतुक भारताचे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनीही केले आहे. भारताआधी नेपाळसारख्या देशाला महिला सरन्यायाधीश मिळावी हा एक आदर्शच. नेपाळमध्ये अध्यक्ष व सभापतीही महिलाच आहेत यावरून तेथील स्थित्यंतर दिसून येते. नेपाळी राज्यघटनेवरून वाद सुरू असताना कार्की यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांचा जन्म शंकरपूर येथे ७ जून १९५२ रोजी झाला. नेपाळमधील त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी व बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांना २००४ मध्ये वरिष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली. बिराटनगर येथील बार असोसिएशनच्या त्या अध्यक्षाही होत्या. २००६ मध्ये त्यांना नेपाळची राज्यघटना तयार करणाऱ्या समितीचे सदस्यत्व मिळाले. काही काळ त्यांनी उच्च न्यायालयातही न्यायाधीशपदावर काम केले. २००९ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीश नेमण्यात आले. सहा वर्षांनी त्यांना कायमस्वरूपी नेमणूक मिळाली. त्या मानवी हक्क कार्यकर्त्यां असून अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या नेपाळ शाखेसह इतर संघटनांशी त्यांचे संबंध आहेत. नेपाळमधील यादवी युद्ध २००६ मध्ये संपल्यानंतर २३९ वर्षांची राजेशाही संपुष्टात आली. हिंदू राष्ट्र हे बिरुद पुसले जाऊन नेपाळ धर्मनिरपेक्ष बनला तो याच काळात. या पुरुषसत्ताक देशाच्या लोकशाहीत सर्वसमावेशकता येत आहे. तेथील राज्यघटनेतही महिलांना पुरेसे स्थान सर्व सरकारी संस्थांत कायद्यानुसार दिले आहे. मुलींना समान हक्क आहेत. शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या कार्की या एक निर्भीड न्यायाधीश आहेत. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता त्या रामशास्त्री बाण्याने काम करीत आहेत. कायद्यापुढे कुणी श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, लहान-थोर नसतो, असे त्या सांगतात. नेपाळमध्ये आधी पुरुषाच्या नागरिकत्वानुसार मुलांना नागरिकत्व मिळत असे. कार्की यांनी नंतर दिलेल्या निकालांमुळे मातेचे नागरिकत्व मुलाला मिळू लागले. न्यायदानात व्यक्तिगत संबंध व दडपण यांना थारा न देणे हे त्यांचे एक वैशिष्टय़ आहे. भ्रष्टाचाराचा कार्की यांना तिटकाराच आहे, त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे वेगाने हाताळण्याचे ठरवले आहे. महिला कुठल्या एखाद्या पदावर केवळ महिला म्हणून पोहोचत नाही तर ती पुरुषांइतक्याच कर्तृत्वाने मोठी शिखरे पादाक्रांत करीत असते. कार्की यांच्या नियुक्तीने नेपाळसारख्या छोटय़ा देशाने मोठा आदर्श घालून दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2016 2:38 am

Web Title: sushila karki
Next Stories
1 पद्मा सचदेव
2 विनू पालिवाल
3 जनरल (निवृत्त) जे. जे. सिंग
Just Now!
X