‘मेरे पास माँ है..’ ‘दीवार’ चित्रपटातील हा अजरामर संवाद ४२ वर्षांनंतर टीना दाबीने मंगळवारी माध्यम प्रतिनिधींना ऐकवला तेव्हा तिच्या डोळ्यांत अभिमान आणि अश्रू होते.. देशातील सर्वात आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अव्वल येण्याचा मान टीनाने पटकावल्याचे वृत्त आले तेव्हा तिने याचे अर्धे श्रेय आपली आई हेमाली यांना दिले. हेमाली या स्वत: भारतीय अभियांत्रिकी सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून दूरसंचार खात्यात त्या अधिकारी होत्या. टीनाला यूपीएससीच्या अभ्यासात मदत व्हावी म्हणून त्यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली होती. तिचे वडील जसवंत हेही अभियंते असून बीएसएनएलमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.
टीनाचे यश ती मागास समाजातील आहे म्हणून महत्त्वाचे नाही, तर पहिल्याच प्रयत्नात, तेही वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी ती देशात अव्वल येते यासाठी महत्त्वाचे आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव, अमेरिकेतील भारताच्या माजी राजदूत निरुपमा राव यांच्यासारख्यांच्या समवेत आता टीनाचे नाव घेतले जाईल. आपल्याकडे बारावीनंतर अभियांत्रिकी वा वैद्यकीय हे दोनच पर्याय आहेत याच दृष्टीने विचार केला जातो; पण बिहार, उ. प्रदेश, दिल्ली यांसारख्या प्रदेशांत नागरी सेवा परीक्षेत तुला यश मिळवायचे आहे हे तारुण्याच्या उंबरठय़ावरच मुलांच्या मनावर बिंबवले जाते. टीनाही त्याला अपवाद नव्हती. जीएस मेरी स्कूलमध्ये शिकताना दहावीत तिला ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. आईवडील अभियंता असले तरी तिने प्रवेश घेतला तो कला शाखेत. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये. बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेतही ती ‘टॉपर’ ठरली होती. तेव्हापासूनच नागरी सेवा परीक्षा देण्याची पूर्वतयारी तिने सुरू केली.
बीएला राज्यशास्त्र हा प्रमुख विषय तिने जाणीवपूर्वक निवडला. तीन वर्षांत अभ्यासक्रमातील पुस्तकांबरोबर संबंधित विषयांची शेकडो पुस्तके तिने वाचून काढली. यूपीएससीच्या असंख्य जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला. पदवीधर झाल्यानंतर तिला अनेकांनी दिल्ली विद्यापीठात एमएला प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता, पण तिने तो मानला नाही. सतत १० ते १२ तास यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. चाळणी आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राज्यशास्त्र हाच विषय घेऊन आयएएस झालेल्या अनेकांशी तिने चर्चा केली. मुलाखतीचे तंत्र समजून घेतले. ४० मिनिटे तिची मुलाखत झाली आणि एकाही प्रश्नाचे उत्तर न चुकल्याने तिला हे यश मिळाले. दिल्लीची राहणारी असली तरी टीनाने सेवेसाठी हरयाणा केडर मागितले आहे. लिंगभेद आणि सामाजिक मागासलेपण हा हरयाणाला मिळालेला शाप असून तो दूर करण्यासाठी तेथे काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले. दोन वर्षे सतत अभ्यास केल्याने काही दिवस आता भरपूर पाटर्य़ा करणार आणि मधुबनी पेंटिंगकडे लक्ष देणार, असे ती म्हणते.