‘शरीरसौष्ठव हा खेळ नसून माझ्यासाठी दैवत आहे. त्यामुळे त्याची पूजा करणारे माझे बांधवच. या दैवताशी प्रामाणिक राहिलात तर तुम्हाला उदंड आयुष्य मिळू शकते. त्यामुळे माझ्या मनात या दैवताबद्दल असीम श्रद्धा आहे,’ हे वाक्य त्यांच्या तोंडी नेहमीच असायचे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांना शरीरसौष्ठवाचा ध्यास होता, कारण त्याच्या पल्याड त्यांचे जगच नव्हते. मार्गदर्शन मागण्यास त्यांच्याकडे गेलेले कधीही रित्याहाती परतले नाहीत. वयाचे शतक ओलांडल्यावरही शरीरसौष्ठव स्पर्धाना ते आवर्जून उपस्थित असत. मनात कसलीही अढी न ठेवता शरीरसौष्ठवपटूंना मदत करत. शरीरसौष्ठव जगताचे खऱ्या अर्थाने ते सदिच्छादूतच होते. त्यामुळेच मनोहर ऐच यांच्या निधनाने शरीरसौष्ठव विश्व हेलावले.

ऐच हे ब्रिटिश अधिकाऱ्यांना व्यायाम करण्यासाठी मदत करायचे. त्यांची व्यायाम करण्याची पद्धत, पीळदार शरीरयष्टी व ताकद पाहून अधिकाऱ्यांनी त्यांना शरीरसौष्ठव करण्याचा सल्ला दिला. त्यापूर्वी कुस्ती आणि वेटलिफ्टिंगसारखे ताकदीचे खेळ ते खेळत होते. पण या सल्ल्यानंतर त्यांनी शरीरसौष्ठव या खेळावरच लक्ष केंद्रित केले. दिवसातील १२ तास त्यांचे व्यायामशाळेमध्येच व्यतीत होत. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी होती. जादूगार पी.सी. सरकार यांच्या कार्यक्रमातही त्यांनी आपली कला सादर केली.  ‘मिस्टर हक्र्युलस’ ही स्पर्धा त्यांनी १९५१ साली जिंकली. त्या वर्षीच त्यांना ‘मिस्टर युनिव्हर्स’ या जागतिक स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पण जेतेपद पटकावण्याचा त्यांचा अट्टहास एवढा की, त्यांनी लंडनमध्ये राहूनच या स्पर्धेसाठी सराव केला. १९५२ साली त्यांनी ‘मिस्टर युनिव्हर्स’ या किताबाला गवसणी घातली. तीन वेळा त्यांनी आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदकही पटकावले होते.

शरीरातील प्रत्येक स्नायूंवर त्यांचे नियंत्रण एवढे होते की, छातीचा फक्त एखादाच स्नायू फुगवण्याची कला त्यांना अवगत होती. त्यामुळे प्रत्येक पोझ देताना त्यांचे शरीर पाहणे, ही चाहत्यांसाठी एक मेजवानीच ठरायची. ही कला त्यांनी शरीरसौष्ठवपटूंना शिकवलीही, पण प्रेमचंद डोग्रासारखे काही इनेगिने शिष्यवगळता ती कुणालाच जमली नाही. ‘पॉकेट हक्र्युलस’ या टोपणनावाने ते शरीरसौष्ठव विश्वामध्ये प्रसिद्ध होते.

जाज्वल्य देशप्रेम, ही त्यांची आणखी एक ओळख. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जरी त्यांना शरीरसौष्ठव खेळात आणले असले तरी १९४२ साली भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या त्यांनी श्रीमुखात हाणली. त्यामुळेच त्यांना अटक करून तुरुंगातही डांबले गेले. ‘मिस्टर वर्ल्ड’ या स्पर्धेची तयारी त्यांनी तुरुंगातच केली होती. देशानेही आपला अभिमान बाळगावा, असे ऐच यांना नेहमी वाटत असे. पण केंद्र सरकारने त्यांची साधी दखलही घेतली नाही. एखादा पुरस्कार आपल्याला मिळावा, ही त्यांची इच्छा मात्र अधुरीच राहिली.