पर्यावरणवादी म्हणजे सतत विकास प्रकल्पांना विरोध करणारे, अशीच प्रतिमा अनिर्बंधतावाद्यांकडून गेल्या काही वर्षांत तयार करण्यात आली. मात्र अशा विरोधासह पर्यावरणप्रेम आणि पर्यावरण संवर्धन यांचीही जोड पर्यावरणवादाला असते. त्या अर्थाने पर्यावरणवादी, पर्यावरणप्रेमी म्हणून गेल्या पाच दशकांपासून पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या उल्हास राणेंचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे उठून दिसायचे. आक्रस्ताळी विरोध न करता अतिशय शांत, मृदू पण तितक्याच ठामपणे आपली भूमिका पटवून देणे, कायम लोकसहभागाला केंद्रस्थानी ठेवून चळवळ पुढे नेणे ही त्यांची वैशिष्टय़े होती. व्यावसायिक कौशल्याचा खुबीने वापर करून पर्यावरण संवर्धनाला चालना देणारे उल्हास राणे मंगळवारी (२७ ऑक्टो.) निवर्तले.

ऐंशीच्या दशकात पर्यावरण चळवळी ऐन भरात आल्या तेव्हा त्यांचा या क्षेत्रात प्रवेश झाला. एकीकडे वास्तुरचनाकाराचा व्यवसाय सुरू केलेला आणि दुसरीकडे मन निसर्गात रमत होते. बीएनएचएस, विश्व वन्यजीव निधी अशा संस्था, सलीम अली, हुमायून अब्दुलअली यांचे मार्गदर्शन यातून राणे घडत गेले. त्यांनी या विषयाचे शास्त्रीय शिक्षणदेखील घेतले. पश्चिम घाट बचाव मोहीम, सह्य़ाद्री वाचवा मोहीम, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना असा त्यांचा व्याप गेल्या पाच दशकांत वाढताच राहिला. पण क्लिष्ट शास्त्रीय भाषेतील शोधनिबंध समजणारे किंवा छंदाच्या पातळीवरला स्वत:पुरता आनंद शोधणारे या दोन्ही टोकांच्या मध्ये ते राहिले. प्रत्यक्ष जंगलांमध्ये, माणसांमध्ये वावरून पर्यावरण समस्यांवर उत्तर शोधण्यावर त्यांचा भर राहिला. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यतील नांदूर मधमेश्वर येथे पक्षी अभयारण्य घोषित करण्याची पक्षिमित्रांची धडपड यशस्वी झाली. भीमाशंकरच्या जंगलास अभयारण्याचा दर्जा मिळावा यासाठीचा संघर्ष त्यांनी सर्व पातळीवर केला. अभयारण्यासोबत येणाऱ्या बंधनांबाबत भीमाशंकर जंगलातील गावकऱ्यांच्या मनातील आकस त्यांनी प्रत्यक्ष संवादातून दूर केला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक कौशल्याचा वापर त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या कामात केला. मग ते महानगरी मुंबईतील ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ असो की आसाममधील देशातले पहिले फुलपाखरू उद्यान, राणे यांची छाप त्यावर उमटलेली दिसते. गेल्या पाच दशकांत त्यांनी असे कैक उपक्रम हाताळले. वास्तुरचना ही लोकशाहीचा आविष्कार असू शकते या मताचा त्यांच्यावर प्रभाव होता. ‘लोकशाही’तील अनेक घटकांना  त्यांनी निसर्गाचीदेखील जोड दिली. चटई क्षेत्र निर्देशांकाबरोबरच मोकळ्या जागा, निसर्ग संवेदनाक्षम परिसर यांचादेखील निर्देशांक असावा आणि दोहोंचा समतोल साधला गेल्यास विकास प्रकल्प हे पर्यावरणस्नेही नियोजन करतील अशी त्यांची भूमिका राहिली. त्यांच्या निधनाने, एक सुसंवादी असा पर्यावरणवादी आपल्यातून गेला.