रांगडय़ा स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या वऱ्हाडातील अमरावतीत वामनरावांचा जन्म झाला. त्यामुळेच असेल कदाचित, त्यांच्या स्वभावात एक बेदरकारपणा होता. परंतु या बेदरकारपणामागे एक हळवा लेखकही दडला होता.. आतून सारखी साद घालणारा! ही साद त्यांच्यातील व्यावसायिक अभियंत्याने ऐकावी हे अपेक्षितच नव्हते. परंतु त्यांच्यातील लेखकाने मात्र अविलंब प्रतिसाद दिला आणि त्यांच्या हातात लेखणी स्थिरावली. तिचा प्रभावही इतका की अभियंत्याच्या नोकरीतून मिळालेले वेतन त्यांनी देशभ्रमंतीवर खर्च केले. या भ्रमंतीदरम्यान मातब्बर लेखकांच्या भेटी घेतल्या. भेटींच्या या संचितातून त्यांच्याही लेखणीला धार चढली. कथा, कादंबरी, ललित लेख, परीक्षणे अशी मजल दरमजल करीत वामनरावांच्या लेखणीचा प्रवास थेट ‘तरुण भारत’ या दैनिकाच्या संपादक पदापर्यंत पोहोचला. त्यांच्या निधनानंतर, त्यांचे साहित्यिक कार्य अनेकांच्या स्मरणात राहील.

कुठलाही संपादक लेखकाला घडवत नाही. परंतु तो घडावा यासाठी त्याला लिहिते करणे, हे संपादकाचे काम असते असे त्यांचे ठाम मत होते. यातूनच त्यांनी नागपूर-विदर्भातील शेकडो लिहित्या हातांना बळ दिले. प्रभाकर सिरास या त्यांच्या मित्रासोबत त्यांनी स्वत: वामनप्रभू या संयुक्त नावाने केलेले कथालेखन आजही जुन्या-जाणत्यांना आठवते. विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष असताना, ‘युगवाणी’चेही त्यांनी संपादन त्यांनी केले. या माध्यमातूनही अनेक उदयोन्मुख लेखकांना त्यांनी विदर्भ साहित्य संघाशी जोडले. युगवाणीसाठी लेखक निवडताना तरुण-स्थानिक प्रतिभा आणि एकूणच साहित्याची मौलिकता यांचा समर्पक मेळ त्यांनी नेहमी साधला. लिखाणातील अभिजात दृष्टी केंद्रस्थानी ठेवून लेखक निवडायचा पण त्याचवेळी स्थानिक संस्कृतीशी त्याची बांधिलकीही पडताळून पाहायची, अशी गुणग्राहकता वामनरावांनी शेवटपर्यंत जपली. त्यांच्या संपादकीय चाळणीतून जे सुखरूप सुटत नव्हते त्यांची नाराजीही वामनरावांनी झेलली. परंतु आपल्या तत्त्वांशी तडजोड कधीच स्वीकारली नाही. त्यांचा हा बेदरकारपणाच त्यांच्या पारदर्शक स्वभावाचा पुरावा.. म्हणूनच एका लग्न समारंभात अंगावर रामनामाचा भगवा झब्बा आणि डोक्यावर जाळीदार मुस्लीम टोपी घालून फिरण्याचे अचाट धाडस वामनराव करू शकले! वयाच्या आठव्या दशकात पोहोचल्यावरही नावीन्यपूर्ण गोष्टींच्या पाठीशी समर्थपणे उभे राहण्यासाठी ते कायम तत्पर असायचे. त्यांचा विदर्भ साहित्य संघातील वावर ही तत्परता नेहमी अधोरेखित करायचा. त्यांच्या शरीराचा व मनाचा उत्साह तसूभरही कमी झालेला कधी दिसला नाही. परंतु बुधवारी एका बेसावध क्षणी काळाने डाव साधलाच. वामनराव आज नाहीत. पण, त्यांच्या कार्याच्या आठवणी लेखन-पत्रकारितेच्या क्षेत्रातील नवोदितांना कायम प्रेरणा देत राहतील.